संजय कदम उद्धव ठाकरेंसोबत, म्हणाले – उद्या शिमग्याला रामदास कदम…

संजय कदम उद्धव ठाकरेंसोबत, म्हणाले – उद्या शिमग्याला रामदास कदम…

रत्नागिरीः उद्या शिमगा आहे. आम्ही शिमग्याला लाकडं जमवतो. चाकरमनी येतात. उद्या शिमग्याला आम्ही रामदास कदमला होळीत गाडू, असा इशारा संजय कदम यांनी रविवारी दिला. संजय कदम यांनी रविवारी उद्धव ठाकरे यांच्या  उपस्थितीत ठाकरे गटात प्रवेश केला. संजय कदम हे आधी राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये होते.

शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर संजय कदम यांनी रामदास कदम यांच्या तोफ डागली. ते म्हणाले, रामदास कदम यांनी येथील स्थानिकांना त्रास दिला. शेतकऱ्यांना त्रास दिला. त्यामुळे तुम्ही कोणीही उमेदवार द्या. आम्हाला रामदास कदम येथे नकोच. त्याला आम्ही येथून पळवूनच लावणार आहोत.

रविवारी खेड येथे उद्धव ठाकरे यांची सभा झाली. या सभेत संजय कदम यांनी कार्यकर्त्यासह ठाकरे गटात प्रवेश केला. त्यावेळी संजय कदम म्हणाले, मला अनेकांनी विचारले की तुम्ही राष्ट्रवादी कॉंग्रेस सोडून ठाकरे गटात प्रवेश का करत आहात. त्यांना मी सांगितले की आता ठाकरेंवर वार झाला आहे. त्यामुळे माझ्यातील खरा शिवसैनिक जागा झाला आहे. त्यामुळेच मी ठाकरे गटात प्रवेश केला, असे कदम यांनी स्पष्ट केले.

या सभेत उद्धव ठाकरे यांनी भाजप व शिंदे गटावर निशाणा साधला. बाळासाहेबांनी भाजपला मोठे केले. आज ते शिवसेना संपवायला निघाले आहेत. हिमत असेल तर मोदींच्या नावाने मते मागवून दाखवा. बाळासाहेबांचे नाव न घेता मते मागवून दाखवा. निवडणूक लढवण्याची तुमच्यात हिमत नाही. अंधेरी पोटनिवडणूक लढवण्याची ताकद तुमच्यात नाही. कसब्यातही त्यांचा पराभव झाला. त्यामुळे माझे खुले आव्हान आहे की निवडणुका घ्या. मी मशाल घेऊन येतो. बघू कोणाचा विजय होतो, असे आवाहनही उद्धव ठाकरे यांनी भाजपला दिले.

ही सभा सुरू आहे, त्या मैदानाचे नाव सुद्धा गोळीबार मैदान आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी शिकवले आहे की, ढेकणं चिरडायला तोफांची गरज नाही. ढेकणं नुसती अशीच चिरडायची असतात, असे म्हणत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी  भाजपा तसेच शिंदे गटावर जोरदार हल्लाबोल केला. ही ढेकणं आपले रक्त पिऊन फुगलेली आहेत. त्यांच्यासाठी गोळीबार करण्याची गरज नाही. त्यांना चिरडण्याची ताकद तुमच्या एका बोटामध्ये आहे. मतदानाच्या दिवशी एक बोट या ढेकणांना चिरडणार आहे. तोफेची गरज नाही, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

First Published on: March 5, 2023 7:20 PM
Exit mobile version