संजय काकडे काँग्रेसच्या वाटेवर

संजय काकडे काँग्रेसच्या वाटेवर

भाजप पुरस्कृत राज्यसभा खासदार संजय काकडे मागील ३ वर्षांपासून मोदी सरकारच्या विरोधात अधूनमधून टिका करत होते. त्यांच्या या वक्तव्यामुळे त्यांची नाराजी दिसून येत होती. आता लोकसभा निवडणुकीच्या तोंडावरच संजय काकडे यांनी त्यांची राजकीय भूमिका बदलण्याचा निर्णय घेतला. आपण काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याचे त्यांची घोषित केले. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर काकडे यांनी घेतलेल्या या निर्णयामुळे पुण्यातील राजकारणाला वेगळेच वळण येण्याची दाट शक्यता आहे.

संजय काकडे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले की, सध्याची बदललेली परिस्थिती पाहता मी लवकरच काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. पक्षप्रवेशानंतर राहुल गांधी जो काही निर्णय घेतील, तो मला मान्य असेल. गेल्या दोन दिवसांमध्ये मी दिल्लीत काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांची भेट घेतली. मी त्यांच्याकडे काँग्रेसमध्ये काम करायची इच्छा व्यक्त केली. त्यांच्याकडून मला सकारात्मक प्रतिसाद मिळाला. त्यामुळे मी लवकरच काँग्रेसमध्ये प्रवेश करेन, असे काकडे यांनी सांगितले. मात्र, मी कुठल्याही पक्षात गेलो तरी माझी आणि मुख्यमंत्र्यांची मैत्री ही कायम राहील, असेही काकडे यांनी स्पष्ट केले.

उमेदवारीसाठी अजित पवारांनीही भेटले
संजय काकडे पुणे लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी मिळवण्यासाठी बरेच प्रयत्न करत आहेत. भाजपकडून उमेदवारी मिळणार नसल्याचे स्पष्ट झाल्यानंतर त्यांनी विविध पर्याय शोधायला सुरुवात केली होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मी भाऊ मानतो, आणि भावाने लाथ मारली तर दुसरीकडे आसरा शोधावाच लागेल, असेही त्यांनी म्हटले होते. काही दिवसांपूर्वी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांचीही भेट घेतली होती. कागदावर मतांची आकडेवारी आणि व्यवस्थापन करण्यात संजय काकडे माहीर समजले जातात. त्यामुळे काकडे यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यास पुण्यातील राजकीय समीकरणे बदलू शकतात.

पुण्यातही होणार आघाडीत बिघाडी
दरम्यान काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अद्याप जागा वाटप होणे बाकी आहे. पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व आहे. त्याठिकाणी राष्ट्रवादी आग्रही असणार आहे, मात्र काँग्रेसवादी झाल्यानंतर काँग्रेसने संजय काकडे यांच्यासाठी पुण्याची जागा मागितल्यास पुण्यातही नगरप्रमाणे दोन्ही काँग्रेसमध्ये बिघाडी होण्याची दाट शक्यता आहे.

First Published on: March 11, 2019 4:16 AM
Exit mobile version