मुंबईसाठी मोदींना तळ ठोकायला सांगा; संजय राऊत यांचे भाजपला आव्हान

मुंबईसाठी मोदींना तळ ठोकायला सांगा; संजय राऊत यांचे भाजपला आव्हान

मुंबईः जनमत आपल्या विरोधात असल्याची जाणीव असल्याने मुंबईसह राज्यातील महापालिकेच्या निवडणुका घेण्यासाठी भाजप टाळाटाळ करत आहे.  मुंबई, ठाण्यासह १४  महापालिकांच्या  निवडणुका घेण्याची हिंमत भाजप का दाखवत नाही. महाराष्ट्रात मोदी-शाह यांना प्रचाराला येऊ द्या. मोदींना मुंबईत तळ ठोकायला सांगा.  इथे तंबू ठोकून बसले तरी आम्ही तुम्हाला जनमत कुणाच्या बाजूने आहे आणि कुणाला जागा मिळतात हे दाखवून देतो, असे आव्हान ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी सोमवारी दिले.

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी गेल्या आठवड्यात मुंबईचा दौरा केला. त्यावेळी नड्डा यांनी मुंबईचा आगामी महापौर हा भाजपचा असेल असा विश्वास व्यक्त केला. तर मुंबई भाजपचे अध्यक्ष  आशीष शेलार यांनी ठाकरे गटाला मुंबईत ५० पेक्षा अधिक जागा मिळणार नाही, असा दावा केला आहे. या पार्श्वभूमीवर आज प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना संजय राऊत यांनी भाजपवर जोरदार टीका केली.

कर्नाटकमधील  भाजपचा पराभव अत्यंत दारुण आहे. भाजपला या देशाची मानसिकता काय  आहे हे दाखवून देणारा हा निकाल आहे. कर्नाटक हे दक्षिणेतले महत्त्वाचे राज्य आहे. दक्षिणेत सर्वाधिक प्रखर हिंदुत्व पहावयास मिळते. कर्नाटक राज्यात सर्वात जास्त मंदिरे आहेत, तेथील लोक श्रद्धाळू आहेत. कर्नाटकसारख्या राज्यात हिंदूंचे सर्वात जास्त सण आणि उत्सव साजरे केले जातात. या हिंदुत्ववादी आणि  श्रद्धाळू राज्याने नरेंद्र मोदी, अमित शाह आणि भाजपचा दारूण पराभव केला आहे. हे सत्य भाजपाचे लोक का स्वीकारत नाहीत? असा  सवाल करत संजय राऊत यांनी  यापुढे संपूर्ण देशभरात असेच पराभव तुमच्या वाट्याला येणार असल्याचा इशारा भाजपाला दिला.

पंतप्रधान  नरेंद्र मोदी हे लहरी राजा आहेत. त्यामुळे नोटबंदीसारखे निर्णय घेत आहेत.  मोदींच्या विरोधात कोणता निकाल गेला, वातावरण विरोधात गेले  की त्यावर पाणी टाकण्यासाठी उलटसुलट निर्णय घेतले जातात हा आतापर्यंतचा इतिहास आहे. दोन  हजारांच्या नोटा रद्द करण्यावर  फार चर्चा न करता निर्णय घेतला.  या देशाला एक लहरी राजा मिळाला आहे. तो लहरी राजा अशाच प्रकारचे निर्णय घेणार आहे. हे गृहीत धरून २०२४ पर्यंतचा काळ ढकलला पाहिजे, असे राऊत म्हणाले.

दरम्यान, नव्या संसद भवनाचे उद्घाटन राष्ट्रपतींच्या हस्ते व्हावे. राष्ट्रपती सर्वोच्च आहे. मोदी आणि शाह हे त्यांना मानत नाही ते जाऊ द्या. संसदेचे कस्टोडियन आणि तिन्ही सैन्य दलाचे प्रमुख राष्ट्रपती असतात. ते सरकारला शपथ देतात. त्यांच्या भाषणाने संसदेचे  अधिवेशन सुरू होते. त्यामुळे राष्ट्रपतींच्या हस्ते संसदेचे  उद्घाटन व्हावे  असे  कोणाचे  म्हणणे असेल तर आम्ही त्याला पाठिंबा देऊ, असेही संजय  राऊत यांनी स्पष्ट केले.

First Published on: May 22, 2023 11:01 PM
Exit mobile version