Sanjay Raut : तुरुंगात केजरीवालांच्या हत्येचा प्रयत्न, राऊतांचा केंद्र सरकारवर गंभीर आरोप

Sanjay Raut : तुरुंगात केजरीवालांच्या हत्येचा प्रयत्न, राऊतांचा केंद्र सरकारवर गंभीर आरोप

केजरीवालांची तुरुंगात हत्या करण्याचा प्रयत्न, राऊतांचा केंद्र सरकारवर गंभीर आरोप

मुंबई : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे कथित मद्य धोरण घोटाळ्याप्रकरणी तिहार तुरुंगात न्यायालयीन कोठडीत आहेत. पण तुरुंगात त्यांना औषधे देण्यात यावी, अशी मागणी त्यांच्या कुटुंबियांकडून करण्यात येत आहे. केजरीवाल यांना मधुमेहाचा आजार असून तुरुंगात त्यांना मधुमेहावरील औषधं मिळवण्यात अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. याच मुद्द्यावरून आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी केंद्र सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. केजरीवालांना तुरुंगात औषधे न देता त्यांची हत्या करण्याचा प्रयत्न करताय का? असा प्रश्न राऊतांकडून उपस्थित करण्यात आला आहे. (Sanjay Raut alligation central government is trying to kill Arvind Kejriwal)

आज सोमवारी (ता. 22 एप्रिल) खासदार संजय राऊत यांना प्रसार माध्यमांनी अरविंद केजरीवाल यांच्याबाबत प्रश्न विचारला यावेळी त्यांनी केंद्र सरकारवर आरोप करत संताप व्यक्त केला. तसेच, त्यांनी त्यांच्यासोबतही तुरुंगात असेच करण्यात आले होते, असा अनुभव सांगितला. याबाबत ते म्हणाले की, मलाही तुरुंगात असताना माझी औषधे मिळत नव्हती. असाच अनुभव केजरीवाल यांनादेखील येत आहे. केजरीवाल यांना उच्च मधुमेहाचा (हाय डायबिटीज) त्रास आहे. मात्र तुरुंगात त्यांना इन्सुलिन आणि औषधे दिली जात नाहीयेत. सरकार आणि तुरुंग प्रशासनाने थोडी मानवता बाळगली पाहिजे.

हेही वाचा… Arvind Kejriwal : केजरीवाल तुरुंगात इन्सुलिनपासून वंचित; ‘आप’चा आरोप तर तिहार प्रशासनाने दिले उत्तर

तसेच, अरविंद केजरीवाल हे दिल्लीचे मुख्यमंत्री आहेत. दिल्लीच्या विधानसभेत केजरीवाल यांच्याकडे बहुमत आहे. तसेच ते एक सामाजिक कार्यकर्तेदेखील आहेत. केंद्र सरकार त्यांना त्यांची औषधे देत नाहीत. त्यांच्या कुटुंबाला त्यांच्यापर्यंत औषधे पोहोचवू देत नाही. याचा अर्थ तुम्ही तुरुंगात त्यांची हत्या करण्याचा प्रयत्न करताय का? असा गंभीर प्रश्न राऊतांकडून यावेळी उपस्थित करण्यात आला.

माझा अनुभवही खूप वाईट…

खासदार संजय राऊत यांनी त्यांना तुरुंगात आलेला अनुभव सांगत म्हटले की, तुरुंगात असताना मलाही खूप वाईट अनुभव आले आहेत. माझी औषधे0 माझ्यापर्यंत पोहोचवली जात नव्हती. औषधांसाठी मला झगडावे लागत होते. आमच्या लोकांना आमची औषधे आम्हाला देण्यापासून रोखले जात होते. जर आम्हालाच अशी वागणूक मिळत असेल तर तुरुंगातील सामान्य कैद्यांची काय अवस्था असेल? दिल्लीचे माजी मंत्री मनिष सिसोदिया, सत्येंद्र जैन, झारखंडचे माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनाही असाच त्रास सहन करावा लागत आहे. राजकीय बदला घेण्यासाठी तुम्ही या लोकांना तुरुंगात टाकले आहे आता किमान त्यांना त्यांची औषधे तरी द्या, असे राऊतांकडून सांगण्यात आले.

हेही वाचा… Sanjay Raut : हिंदुत्वाचे तुम्ही काय दिवे लावले? राऊतांचा फडणवीसांना खोचक सवाल

मोदी-शहांचे सैतानी सरकार…

आणीबाणीच्या काळात अटल बिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी यांच्यासारखे अनेक मोठे नेते तुरुंगात होते. माझ्या माहितीप्रमाणे तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी या स्वतः वेगवेगळ्या तुरुंगांच्या अधिकाऱ्यांशी बोलायच्या. ज्या ज्या तुरुंगात या नेत्यांना ठेवले होते तिथे त्यांची योग्य व्यवस्था आहे का ते पाहायच्या. त्यांची औषधे, त्यांचे जेवण त्यांना मिळते का याची माहिती घ्यायच्या. या नेत्यांच्या सर्व गरजा तुरुंगात पूर्ण होत आहेत का? त्यावर लक्ष ठेवायच्या. परंतु, देशातले मोदी-शहांचे खतरनाक आणि सैतानी सरकार असे काही करत नाही. ते मुख्यमंत्र्यांना औषधे मिळू देत नाहीत, असा आरोप खासदार संजय राऊत यांनी केला आहे.


Edited By : Poonam Khadtale

First Published on: April 22, 2024 12:44 PM
Exit mobile version