Kirit Somaiya : सोमय्यांनी चंद्रावर, मंगळावर जाऊन आमच्या जमिनी शोधाव्यात, सोमय्यांच्या आरोपावर शिवसेनेची प्रतिक्रिया

Kirit Somaiya : सोमय्यांनी चंद्रावर, मंगळावर जाऊन आमच्या जमिनी शोधाव्यात, सोमय्यांच्या आरोपावर शिवसेनेची प्रतिक्रिया

भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी पोलिसांच्या कारवाईनंतर ठाकरे सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. सोमय्यांना आज कोल्हापूरच्या दिशेने जाताना कराड पोलिसांनी ओगलेवाडी रेल्वे स्टेशनवर ताब्यात घेण्य़ात आले. त्यांना कराड शासकीय विश्रामगृहात नेण्यात आले. यावेळी किरीट सोमय्यांनी जाहीर पत्रकार परिषद घेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्याविरोधात गंभीर आरोप करत अनेक सवाल उपस्थित केले. किरीट सोमय्यांच्या या आरोपांवर आता शिवसेना खासदार संजय राऊत यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.

अलिबाग आणि जरंडेश्वर येथील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलेल्या चुकीच्या व्यवहारांची माहिती घेण्यासाठी जाणार असे किरीट सोमय्यांनी म्हटले. यासंबंधीत एका प्रश्नावर संजय राऊत म्हणाले की, “सोमय्यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांवरही आरोप केले. सोमय्यांनी मंगळावर,चंद्रावर जाऊन आमच्या लोकांच्या जमिनीची पाहणी करावी. लोकशाहीत त्यांना बोलायचा अधिकार आहे. आरोप कोणीही करु शकतं. कारण आरोप करणाऱ्यांच्या तोंडाला टाळं लावता येत नाही. राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत असेल तर सरकारला कारवाई करावी लागते. त्यानुसारचं गृहमंत्रालयाने किरीट सोमय्यांविरोधात कारवाई केली” असं शिवसेना खासदार संजय राऊत यांनी म्हंटले आहे.

“केंद्राच्या सूचनेनुसार आरोप करायचे तर करु द्या. आरोप कोणावर होत नाहीत. पंतप्रधान नरेंद्र मोदींवर आरोप होतात, अमित शहांवर आरोप होतात. भाजपाशासित मुख्यमंत्र्यांवरही आरोप होतात. आरोप करणं ही फॅशन झाली आहे. कळेल त्यांना आमचा रंग कोणता आहे. मी या विषयावर मुख्यमंत्र्यांशी बोललो. त्यांनी सांगितलं त्याचा मुख्यमंत्री कार्यालयाशी संबंध नाही. ” असं म्हणत सोमय्यांच्या आरोपांना गांभीर्याने घेण्याची गरज नसल्याची टीका संजय राऊत यांनी केली आहे.

मुश्रिफांच्या स्वागताला राष्ट्रवादीचे गुंड येणार होते का?

“घोटाळे करणाऱ्यांऐवजी घोटाळा उघड करणाऱ्यांवरचं ठाकरे सरकारने कारवाई केली, हसन मुश्रीफ यांचा कागलमध्ये दौरा होता. त्यांच्या स्वागतासाठी मोठा जनसमुदाय जमणार आहे. त्याचवेळी सोमय्या कोल्हापूरात येणार आहेत. त्यात सोमय्यांच्या दौऱ्यामध्ये धोका निर्माण होण्याची धारणा निर्माण झाली आहे. गनिमी काव्याने किरीट सोमय्यांवर हल्ला होण्याची शक्यता आहे. असे पत्रातून कळविण्यात आले. ठाकरे सरकारने माझ्याकडील संरक्षण काढून घेतलं आहे. आता माझ्याकडे केंद्र सरकारचे झेड दर्जाची सुरक्षा आहे. गृहमंत्र्यांना याची जबाबदारी स्वीकारावी लागणार आहे. माझ्या जीवाला धोका असल्याची माहिती मला का दिली नाही? हसन मुश्रीफ यांच्या स्वागताला राष्ट्रवादीचे कार्यकर्ते येणार होते की राष्ट्रवादीचे गुंड? राष्ट्रवादीचे कार्यकर्तेच गुंड आहेत का?” असा जहरी सवाल सोमय्या यांनी उपस्थित केला आहे.


केंद्रीय यंत्रणांची मदत घेऊन सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न – संजय राऊत

First Published on: September 20, 2021 12:29 PM
Exit mobile version