भाजपपेक्षा काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष बरा – संजय राऊत

भाजपपेक्षा काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष बरा – संजय राऊत

खेड येथील पदाधिकारी मेळाव्यात बोलताना खासदार संजय राऊत

“तुझं माझं जमेना… पण तुझ्या वाचून करमेना” अशी परिस्थिती सध्या सेना-भाजपमध्ये पाहायला मिळते. दोन्ही पक्ष एकमेकांवर टिका करण्यात कुठही कमी पडत नाहीत. “भाजपाची परिस्थिती बदलत चालली आहे, त्यामुळे भाजपाची टरकली असून भाजपा आमदारांकडून बेताल वक्तव्य केली जात आहेत. एकीकडे ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ असा नारा दिला जातो तर दुसरीकडे ‘बेटी भगाओ’ची प्रवृत्ती दिसून येते. नरेंद्र मोदी आल तसे २०१९ साली जातीलही. मग केंद्रात आणि राज्यात पुन्हा शिवसेनेचीच सत्ता येणार. राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस बरी त्यांना आपल्या बद्दल आदर आपुलकी तरी आहे. मात्र आजपर्यंत भाजप सरकारने शिवसेनेसोबत सुडाचेच राजकारण केले आहे.”, अशा पद्धतीने राष्ट्रवादीचे कौतुक करत शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी भाजपवर टीकास्त्र सोडले. खेड येथे सेना पदाधिकारी आणि लोकप्रतिनिधी यांच्या मेळाव्यात त्यांनी भाजपवर चौफेर फटकेबाजी केली.

शिरुर लोकसभा मतदार संघात आज जुन्नर आंबेगाव खेड येथे पदाधिकारी आणि लोकप्रतिनिधीसह शिवसैनिकांचा मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून खासदार संजय राऊत, खासदार शिवाजी आढळराव आणि जिल्हा प्रमुख राम गावडे उपस्थित होते.

संजय राऊत आपल्या भाषणात म्हणाले की, “शिवसेनेची परिस्थिती आता बदलत चालली आहे. शहरीभागासह ग्रामीण भागात शिवसैनिकांच्या बळावर शिवसेना भक्कम उभी रहात असताना भाजपाची आता टरकली आहे. त्यामुळे शिवसेनेला टार्गेट करण्याचा प्रयत्न केला जात आहे. सत्तेत एकत्र असणारे मित्र पक्ष गेल्या अनेक दिवसांपासून एकमेकांच्या समोरासमोर येऊन एकाच घरात असताना वाभाडे काढत आहेत. मात्र संसार हा अजून तरी एकत्रच चालला आहे.”

केंद्रात आणि राज्यात सत्तेचा उपभोग एकत्र मिळून घेत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदीवरही शिवसेना टिका करायला मागे पहात नाही. २०१९ च्या निवडणुकीत मोदी सत्तेतून पायउतार होतील आणि पुन्हा शिवसेनेचीच सत्ता येईल. त्यावेळी अमित शहा उद्धव ठाकरेंना भेटायची वेळ मागतील, अशी बोचरी टिका संजय राऊत यांनी केली.

“गुन्या गोविंदाने संसार करण्याची स्वप्न पाहत भाजप आणि शिवसेनेची युती झाली. केंद्रात आणि राज्यात दोघेही एकत्र येऊन सुखी संसाराला सुरुवात झाली मात्र काहीच दिवसात या सुखी संसाराला कुणाची तरी नजर लागली आणि एकमेकांवर आरोपप्रत्यारोप करण्यास सुरुवात झाली. कधीकाळी तर राजीनामे खिशात घेऊन काडीमोड घेण्यापर्यत पोहचले मात्र काडीमोड झाला नाही, असे असताना भाजपाकडून शिवसेना संपवण्याचे प्रयत्न सुरु झाले आहे. खालच्या पातळीवर जाऊन सुडाचे राजकारण केले जात असल्याचे पदाधिकारी मेळाव्यात बोलताना खासदार संजय राऊत यांनी सांगितले.

शिवसेनेचे खासदार संजय राऊत मित्र पक्ष असणाऱ्या भाजपावर सडकून टिका करत असताना भाजपा येणाऱ्या निवडणुकीत संपणार आहे असे, बोलून शरद पवारांचे कौतुक करत आहे. यातून राष्ट्रवादी आणि शिवसेनेचा नव्याने संसार उभा रहाणार का? असा प्रश्न निर्माण होत आहे.

First Published on: September 7, 2018 7:35 PM
Exit mobile version