आचारसंहितेचा भंग: संजय राऊत यांना जिल्हाधिकार्‍यांची नोटीस

आचारसंहितेचा भंग: संजय राऊत यांना जिल्हाधिकार्‍यांची नोटीस

खासदार संजय राऊत

शिवसेना नेते आणि सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांच्यावर मुंबई जिल्हा निवडणूक अधिकार्‍यांनी ठेपका ठेवत सोमवारी कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. आचारसंहितेचा भंग केल्याचा आरोप करीत येत्या दोन दिवसांत याप्रकरणी अहवाल सादर करण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत. दैनिक सामनाच्या रविवारच्या अंकात रोखठोक या स्तंभ लेखनात त्यांनी ईव्हीएमवर केलेल्या वक्तव्यावरुन त्यांना ही नोटीस बजावण्यात आली आहे. संजय राऊत यांनी कन्हैया कुमारच्या बाबतीत वादग्रस्त विधान केले होते. कन्हैया बिहारच्या बेगूसराय मतदारसंघातून यावर्षी लोकसभा निवडणूक लढवत आहे. या मतदारसंघाविषयी संजय राऊत यांनी भाष्य केले होते.

 

दैनिक सामनाचे संपादक आणि शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी दैनिक सामनाच्या ३१ मार्चच्या अंकात लिहलेल्या रोखठोक हे स्तंभ लेखन वादात सापडले आहे. हे स्तंभ लेखन करताना त्यांनी ईव्हीएमबद्दल लिहले असून हे लिहताना त्यांनी ईव्हीएम घोटाळा बेगुसरायमध्ये झाला तरी चालेल, असे वाक्य लिहले आहे. हे वाक्य ईव्हीएमच्या वापराबाबत अविश्वास दर्शविणे, निवडणूक प्रक्रियेविषयी गढूळ वातावरण निर्माण करणारे आहे. त्यामुळे जिल्हा निवडणूक अधिकार्‍यांनी संजय राऊत यांच्यावर आदर्श आचारसंहितेचा भंग केल्याचा ठपका ठेवला आहे.

या नोटीसीनुसार राऊत यांना ३ एप्रिल २०१९ संध्याकाळी पाच वाजेपर्यंत यासंदर्भातील अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे ते या नोटीसीला काय उत्तर देतात याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

First Published on: April 1, 2019 10:28 PM
Exit mobile version