औरंगजेब, अफझलखानसारखं तेच संकट आता दिल्लीवरून महाराष्ट्रावर आलंय- संजय राऊत

औरंगजेब, अफझलखानसारखं तेच संकट आता दिल्लीवरून महाराष्ट्रावर आलंय- संजय राऊत

शिंदे गट दिल्लीत जाऊन मुजरा करत गुलामी करतंय, असा हल्लाबोल राऊतांकडून करण्यात आला आहे.

गेल्या काही दिवसांपासून एकाच वेळी चारही बाजूने आलेल्या संकटांशी सामना करत असलेली शिवसेना एका मोठ्या चक्रव्यूहात अडकल्याचं दिसतंय. उद्धव ठाकरे यांच्यासमोर आणि त्यांच्या पक्षासमोर अडचणींचे डोंगरच उभे असताना संजय राऊत यांनी एक मोठं वक्तव्य केलंय. साडेतीनशे वर्षापूर्वी जे औरंगजेब आणि अफझलखानाचं संकट आलं होतं तेच संकट आता दिल्लीवरून पुन्हा महाराष्ट्रावर आलंय, असं संजय राऊत म्हणाले.

संजय राऊत सध्या नाशिकमध्ये आहेत. यावेळी माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी हे वक्तव्य केलंय. यावेळी बोलताना संजय राऊत यांनी इतिहासाची आठवण करून देत सांगितले की, “दिल्लीतून कायम महाराष्ट्रावर आक्रमण होत आलंय. महाराष्ट्र कायम दिल्लीच्या राजवटीविरोधात लढत राहिला आणि आताही लढत आहे. हा इतिहास आहे. महाराष्ट्राची अस्मिता ही शिवसेना आहे. त्यावर घाला घालण्याचा प्रयत्व दिल्लीतून होतोय. साडेतीनशे वर्षापूर्वी जेव्हा दिल्लीवरून औरंगजेब, अफझलखानाचे संकट महाराष्ट्रात आलं होतं त्यावेळी महाराष्ट्र जाती-पाती विसरून एकत्र येऊन शिवरायांच्या आशिर्वादाने लढला आणि हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. तसंच संकट आज दिल्लीवरून महाराष्ट्रात आलंय. त्यामुळे यावेळी सर्वांनी एकत्र येऊन शिवरायांची प्रेरणा घेऊन या संकटाशी लढा दिला पाहिजे.” असं आवाहन देखील संजय राऊत यांनी केलंय.

“अमित शाहांना महाराष्ट्र काय आहे ते कळणार नाही” असं बोलून संजय राऊतांनी अमित शाहांवर घणाघात केलाय. तसंच नुकतंच शरद पवार यांनी पहाटेच्या शपथविधीवर केलेल्या मोठ्या वक्तव्याबाबत विचारणा केली असता संजय राऊत म्हणाले की, “राष्ट्रपती राजवट लागू करून राज्यात महाविकास आघाडीचं सरकार येणार नाही अशी कोंडी केली होती. पहाटेच्या शपथविधीमुळे ही कोंडी फुटली आणि राष्ट्रपती राजवट फक्त २४ मिनीटात उठली, शरद पवार म्हणाले ते सत्य आहे.” असं म्हणत संजय राऊतांनी शरद पवार यांचं कौतुक केलं. यापुढे त्यांनी यापूर्वी केलेल्या एका विधानाची आठवण करून देत म्हणाले की, “शरद पवारांना ओळखायला १०० जन्म घ्यावे लागतील, हे मी आधीही म्हटलं होतं. त्यावेळी माझ्यावर टिका झाली होती. पण आता ते कळलं असेल.”

First Published on: February 22, 2023 3:34 PM
Exit mobile version