संजय राऊत नाशिक दौर्‍यावर; डॅमेज कंट्रोलसाठी पदाधिकार्‍यांशी ‘वन टू वन’ चर्चा

संजय राऊत नाशिक दौर्‍यावर; डॅमेज कंट्रोलसाठी पदाधिकार्‍यांशी ‘वन टू वन’ चर्चा

नाशिक : पत्राचाळ घोटाळा प्रकरणी अटकेत असलेल्या संजय राऊत यांची जामिनावर सुटका झाल्यानंतर संजय राऊत नाशिक दौर्‍यावर कधी येणार याची शिवसैनिकांना उत्सुकता होती. त्यातच नाशिक शहरातील डझनभर नगरसेवक शिंदे गटाच्या वाटेवर असल्याच्याही जोरदार चर्चा असल्याने राज्यात पडझडीनंतर बर्‍याचअंशी शाबूत राहिलेला नाशिकचा किल्ला शाबूत ठेवण्याच्या अनुषंगाने राऊत यांच्या नाशिक दौर्‍याकडे बघितले जात आहे. या दौर्‍यात राऊत नाशिक मधील पदाधिकारी व नगरसेवकांशी ‘वन टू वन’ चर्चा करणार असल्याचीही माहिती समजते. त्यामुळे राऊत यांचा हा दौरा पक्षातील डॅमेज कंट्रोल करण्यासाठी महत्वपूर्ण मानला जातोय.

मुंबईतील पत्राचाळ प्रकरणात ईडीने संजय राऊत यांना अटक केली होती. शंभरहून अधिक दिवस कोठडीत राहिल्या नंतर राऊत यांची न्यायालयाने जामीनावर मुक्तता केली. यानंतर प्रकृतीच्या कारणाने राऊत यांनी दौरा करणे टाळले होते. मात्र, नाशिकमध्ये शिंदे गटाकडून ठाकरे गटाला शह देण्यासाठी नगरसेवक फोडण्याच्या हालचालींना वेग आला आहे. खरतर राज्यात राज्यात चार महिन्यापूर्वी सत्तांतर झाले. त्यातच एकनाथ शिंदे आणि त्यांच्या सोबत ४० आमदार त्यानंतर १३ खासदारांनी वेगळ जाण्याचा निर्णय घेतला. त्यातून शिवसेनेत उभी फुट पडली. राज्यभरात शिवसेना दुभंगली गेली. नाशिक जिल्ह्यातीलही दोन आमदार आणि नाशिक लोकसभेचे खासदार गोडसे यांनीही शिंदेच्या सोबत जाण्याचा निर्णय घेतला. परंतु, तरीही नाशिक शहरात त्याचा परिणाम झाल्याचे दिसून आले नाही. नाशिक शहरातील एक नगरसेवक आणि बोटावर मोजण्या इतके पदाधिकारी वगळता जास्त पडझड झाली नाही.

अनेक नगरसेवक, पदाधिकारी कंपुवर होते परंतु त्यांनी कोणताही निर्णय घेतलेला नव्हता. महानगरपालिका निवडणुका होण्याची शक्यता निर्माण झाल्याने मागील आठवड्यापासून शहरातील डझनभर माजी नगरसेवकांची शिंदे गटात सामील होण्याच्या हालचालींना जोर चढला आहे. एवढे मोठे भगदाड पडल्यानंतर त्याचा पाठोपाठ इतरही पदाधिकारी, नगरसेवक त्यावाटेने जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. याचमुळे संजय राऊत यांचा हा दौरा महत्वपूर्ण मानला जात आहे.

असा असेल दौरा

संजय राऊत १ डिसेंबर रोजी नाशकात दाखल होती. पाहिल्या दिवशी ते आढावा घेतील. तर २ डिसेंबर रोजी राऊत शहर व जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकार्‍यांच्या मुलाखती घेतील. या माध्यमातून ते पदाधिकारी, लोकप्रतिनिधि यांच्यासोबत समोरासमोर एकांतात चर्चा करण्याचीही शक्यता वर्तवण्यात येत आहे.

स्वागत जोरदार करण्याची तयारी

संजय राऊत यांच्याकडे पक्षाच्या उत्तर महाराष्ट्र विभागाची जबाबदारी आहे. तसेच, अनेक वर्ष नाशिकचे संपर्कप्रमुख पद त्यांच्याकडे आहे. त्यामुळे नाशकातील अनेक कार्यकर्त्यांशी त्यांचा थेट संपर्क आहे. त्यांचाही नाशिकशी विशेष राबता आहे. त्यामुळे १०३ दिवस तुरुंगात राहून जामिनावर मुक्तता झाल्यानंतर प्रथमच राऊत नाशकात येत असल्याने त्यांचे जोरदार स्वागत केले जाणार असल्याची माहिती समोर येत आहे. त्यामाध्यमातून शक्तिप्रदर्शनाचीही तयारी करण्यात येत आहे.

First Published on: November 30, 2022 7:46 PM
Exit mobile version