अजित पवारांनी शिवसेनेचे नगरसेवक फोडले नाहीत – संजय राऊत

अजित पवारांनी शिवसेनेचे नगरसेवक फोडले नाहीत – संजय राऊत

पारनेरमधील शिवसेनेच्या पाच नगरसेवकांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर महाविकास आघाडीत धुसफूस सुरु असल्याच्या चर्चा सुरु होत्या. यावर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी आज मुंबईत पत्रकार परिषद घेत भाष्य केलं. पारनेरमध्ये आमच्या काही नगरसेवकांनी अजित पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश केला. मात्र, याचा अर्थ अजित पवारांनी किंवा वरिष्ठ नेत्यांनी नगरसेवक फोडले असा होत नाही, असं संजय राऊत म्हणाले.

“पारनेरच्या मुद्द्यावर शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये चर्चा झाली असून हा स्थानिक पातळीवरचा विषय होता, तो तिथेच संपायला हवा होता. आमच्या काही नगरसेवकांनी अजित पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश केला. मात्र, याचा अर्थ अजित पवारांनी किंवा वरिष्ठ नेत्यांनी नगरसेवक फोडले असा होत नाही. त्यामुळे आता हा विषय चर्चेत येऊ नये, असं मला वाटतं,” असं संजय राऊत म्हणाले.

सरकारमध्ये अंतर्विरोध काय, तर आंतरपाटही नाहीये

संजय राऊत यांनी यावेळी पुन्हा एकदा महाविकास आघाडी सरकार पाच वर्ष टिकेल असा विश्वास व्यक्त केला असून सरकारमध्ये कोणतेही मतभेद, कुरबुरी, अंतर्विरोध नसल्याचं सांगितलं आहे. देवेंद्र फडणवीस म्हणतात की, महाविकास आघाडीमध्ये अंतर्विरोध आहे. अंतर्विरोध काय, तर आंतरपाटही नाहीये. आम्ही वरमाला घातल्या असून आमच्यात कोणताही आंतरपाट नाही आहे. महाविकास आघाडीचं सरकार हे देशातील तीन प्रमुख पक्षांनी बनवलेलं आहे. ही खिचडी नाही. हे सरकार पाच वर्ष पूर्ण करेल. काल शरद पवार यांची प्रदीर्घ मुलाखत घेतली. हे सरकार पाच वर्ष काम करेल असा ठाम विश्वास शरद पवारांनी व्यक्त केला आहे, असं संजय राऊत म्हणाले.

First Published on: July 7, 2020 4:43 PM
Exit mobile version