हत्येच्या ठिकाणची तिन्ही सीसीटीव्ही कॅमेरे बंद का? वारिशे हत्या प्रकरणात राऊतांचा परखड सवाल

हत्येच्या ठिकाणची तिन्ही सीसीटीव्ही कॅमेरे बंद का? वारिशे हत्या प्रकरणात राऊतांचा परखड सवाल

Sanjay Raut on Shashikant Warishe Muder Case | रत्नागिरी – रिफायनरी प्रकल्पाविरोधात लिहिल्याने पत्रकार शशिकांत वारिशे यांची हत्या करण्यात आली आहे. या हत्येप्रकरणी पंढरीनाथ आंबेरकर याला अटक झाली असून या प्रकरणाच्या तपासासाठी ११ अधिकाऱ्यांची एसआयटी स्थापन करण्यात आली आहे. मात्र, यावरून शिवसेना खासदार संजय राऊत यांनी अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. शशिकांत वारिशे यांची ज्याठिकाणी हत्या झाली तेथील तिन्ही सीसीटीव्ही कॅमेरे अचानक बंद कसे झाले, असा परखड सवाल त्यांनी आज उपस्थित केला. ते आज रत्नागिरी दौऱ्यावर असून पत्रकार शशिकांत वारिशे यांच्या कुटुंबियांची भेट घेणार आहेत.

या प्रकरणातील संशयित मारेकरी पंढरीनाथ आंबेरकर याचे कोणत्या राजकीय पक्षाची लागेबांधे आहेत हा तपासाचा विषय आहे. याप्रकरणाच्या चौकशीसाठी एसआयटी स्थापन करण्यात आली आहेत. मात्र, या एसआयटी समितीमध्ये ११ अधिकारी कोण आहेत? देशात कोणतीही यंत्रणा स्वतंत्र आणि निःपक्ष नाही. न्यायालायापसून सर्व यंत्रणा दबावाखाली आहेत, असं संजय राऊत म्हणाले.

राजापूरच्या पेट्रोल पंपाजवळ हा घातपात घडवून आणला. त्याच्या आजूबाजूला तीन सीसीटीव्ही कॅमेरे होते. एक हॉटेलमध्ये, एक पेट्रोल पंपावर आणि एक टायरवाल्याजवळ. मात्र, हत्येवेळी तिन्ही सीसीटीव्ही कॅमेरे अचानक बंद कसे झाले, असा सवाल राऊतांनी विचारला आहे. तसंच, पेट्रोल पंपावर आठ कर्मचारी होते. यांनी जबाब देऊ नये म्हणून त्यांच्यावर दबाव टाकला जात आहे, असा आरोपही राऊतांनी केला.

उदय सामंत म्हणतात की प्लान करून खून करण्यात आला. पण प्लान एकट्याचा होत नाही. मग या प्लानमध्ये कोण कोण आहे? याची सखोल चौकशी झाली पाहिजेय. एका गरीब सामान्य पत्रकाराचा खून करण्याकरता कोणी प्लान केला? याबाबत एसआयटी तपास करेलच. पण या प्रश्नी पोलिसांनी का चौकशी केली नाही? आंबेरकर जमिनीचा दलाल होता. त्याने जे जागांचे व्यवहार केले आहेत त्यामध्ये अनेक बेनामी व्यवहार आहेत, असाही आरोप राऊतांनी आज केला.
अंगणेवाडीच्या जत्रेत प्रमुख नेते उपस्थित होते. मला कोणावर थेट आरोप करायचे नाहीत. पण, राज्याचे गृहमंत्री सभा घेतात आणि रिफायनरी प्रकल्प होणारच, कोणी आडवं आलं तर पाहू असं म्हणतात. आणि दुसऱ्याच दिवशी पत्रकाराचा मृत्यू होतो, असं म्हणत त्यांनी देवेंद्र फडणवीसांकडेच बोट ठेवलं. शशिकांत वारिशेंच्या कुटुंबीयांना ५० लाख द्यावेत ही आमची मागणी आहे. ही हत्या म्हणजे बलिदान आहे. त्यामुळे त्यांच्या कुटुंबीयांना ५० लाखसुद्धा कमी पडतील. त्यांचं कुटुंब, मुलगा, आई यांचा आक्रोश सरकारने ऐकला पाहिजे, असंही राऊत म्हणाले.

First Published on: February 17, 2023 1:18 PM
Exit mobile version