राष्ट्रपती राजवट लावायची असेल, तर उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्रात एकत्रच लावा : संजय राऊत

राष्ट्रपती राजवट लावायची असेल, तर उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्रात एकत्रच लावा : संजय राऊत

भाजपाचे माजी खासदार किरीट सोमय्या यांच्या कारवर हल्ला करण्यात आला. या हल्ल्यानंतर भाजपचे शिष्टमंडळ दिल्लीत केंद्रीय गृहसचिवांच्या भेटीला गेले. मात्र किरीट सोमय्यांच्या या भेटीवर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी टीका केली आहे. शिवाय, ‘राष्ट्रपती राजवट लावायचीच असेल, तर ती उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्र दोन्हीकडे एकाच वेळी लावावी’, असा टोलाही लगावला.

मुंबईत पत्रकारांशी बोलताना संजय राऊत यांनी भाजपवर टीका केली. यावेळी बोलताना त्यांनी उत्तर प्रदेशात 17 बलात्कार झाले असल्याचा दावा केला. त्याचीही माहिती केंद्रीय गृहसचिवांना द्यावी, असा टोला राऊत यांनी लगावला. गेल्या दोन वर्षात अनेकदा भाजपचं शिष्टमंडळ केंद्रीय गृहसचिवांना भेटले. महाराष्ट्रातील कायदा सुव्यवस्थेबाबत तक्रारी असतील, तर तुम्ही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांची भेट आधी घ्या, असा सल्ला राऊतांनी यावेळी दिला आहे.

‘तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही राज्याच्या गृहमंत्र्यांना भेटायला हवं. मुख्यमंत्र्यांना भेटायला हवं.. भेटा ना… उत्तर प्रदेशमध्ये 17 बलात्कार झाले, त्याच्याविषयीही माहिती द्यावी.. राष्ट्रपती राजवट लावायचीच असेल तर यूपी आणि महाराष्ट्रात एकत्रच लावा.. लावा ना.. ढोंग चाललीएत सगळी.. दोन चार लोकं येतात दिल्लीत उतरतात,गृहसचिवांना भेटतात.. हे महाराष्ट्राला बनमान करण्याचं षडयंत्र आहे…थोडंसं रक्त आलं तर चालले राष्ट्रपती राजवट लावायला.. महाराष्ट्राशी अडचण आहे, तर तिथल्या मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांना भेटा ना आधी’, असं आवाहनही त्यांनी केलं.

सोमय्यांसह भाजप आमदार मिहिर कोटेचा, आमदार अमित साटम, आमदार पराग शाह, आमदार राहुल नार्वेकर, विनोद मिश्रा यांचा शिष्टमंडळात समावेश आहे. किरीट सोमय्या यांनी स्पेशल टीम पाठवून हल्ल्याची चौकशी करावी, अशी मागणी केली आहे. पोलिसांच्या मदतीनं हल्ला केला गेला, असा आरोप त्यांनी पुन्हा केला. संजय पांडे यांचं निलंबन करण्याची मागणीही त्यांनी केली.खोटी एफआयआर कुणाच्या सांगण्यावरुन करण्यात आली, याची चौकशी करा, अशीही मागणी सोमय्यांनी केली आहे.


हेही वाचा – Nagpur Fire : नागपुरातील फर्निचर वर्कशॉपला लागलेल्या आगीत वृद्धाचा होरपळून मृत्यू

First Published on: April 25, 2022 10:45 AM
Exit mobile version