संजय राऊतांचा धमाका की निव्वळ फार्स?

संजय राऊतांचा धमाका की निव्वळ फार्स?

भाजप नेते किरीट सोमय्या यांच्याकडून सातत्याने भ्रष्टाचाराचे आरोप होत असल्याने शिवसेना खासदार संजय राऊत चांगलेच आक्रमक झालेत. केंद्र सरकार, ईडी आणि राज्यातील भाजपचे नेते आपल्याला जाणीवपूर्वक सापळ्यात अडकवून तुरुंगात धाडण्याच्या प्रयत्नात असल्याचा घणाघाती आरोपही राऊतांनी केला. परंतु या आरोप-प्रत्यारोपांच्या फैरीत केवळ शिवसेनाच नव्हे, तर महाविकास आघाडीवरील प्रत्येक हल्ला टोलवणार्‍या संजय राऊतांच्या सोबतीला एकही खंदा नेता उभा न राहिल्याने संजय राऊत कमालीचे उद्विग्नही झालेत.

ही उद्विग्नता झकटून देत भाजपवर पलटवार करण्यासाठी संजय राऊत यांनी आज मंगळवारी शिवसेना भवनात पत्रकार परिषदेचे आयोजन केले आहे. केंद्रीय तपास यंत्रणांच्या प्रमुखांनी माझी पत्रकार परिषद आवर्जून ऐकायला हवी. कारण या पत्रकार परिषदेतून शिवसेना हा पक्ष बोलणार नसून महाराष्ट्र बोलणार आहे, असा दावा त्यांनी केला आहे. त्यामुळे या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून संजय राऊत खरोखरच मोठा धमाका करतील की आपण एकटे नसून पूर्ण पक्षसंघटन आपल्या पाठीशी उभे असल्याचे दाखवण्यासाठी त्यांनी रचलेला हा फार्स आहे, हे दुपारच्या पत्रकार परिषदेतूनच उघड होईल.

भाजपचे नेते शिवसेना मंत्र्यांवर सातत्याने आरोप करत आहेत. आणखी काही मंत्री तुरुंगाच्या वाटेवर आहेत, असे विधान भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केले आहे. याशिवाय संजय राऊत यांचे निकटवर्ती म्हणून ओळखल्या जाणार्‍या व्यक्तींची ईडीमार्फत चौकशी सुरु आहे. या पार्शवभूमीवर संजय राऊत यांनी आज, मंगळवारी दुपारी 4 वाजता शिवसेना भवनात पत्रकार परिषद घेणार असल्याचे सांगितले आहे. तत्पूर्वी, आज प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना राऊत यांनी उद्याच्या पत्रकार परिषदेची उत्सुकता आणखी वाढवली.

गेल्या काही दिवसांपासून शिवसेना आणि ठाकरे परिवारावर आरोपांचा चिखल उडवला जात आहे. केंद्रीय तपास यंत्रणांच्या माध्यमातून दादागिरी करून धमक्या दिल्या जात आहेत. त्याला आम्ही उत्तर देऊच. मी काय बोलतोय आणि कुणाबद्दल बोलतोय हे सर्वाना माहीत आहे. माझ्या बोलण्यामुळे त्यांची झोप उडाली आहे. आम्हाला धमक्या देऊ नका. आम्ही अशा धमक्यांना घाबरत नाही. मी तर नाहीच नाही. सरकारी यंत्रणेला जे उखडायचे असेल ते उखडावे, असे आव्हान संजय राऊत यांनी भाजपला दिले. विरोधकांनी माझी पत्रकार परिषद काळजीपूर्वक ऐकायला हवी.

केंद्रीय तपास यंत्रणांच्या प्रमुखांनी आवर्जून ऐकायला हवी. शिवसेना हा पक्ष नाही तर महाराष्ट्र, मराठी माणूस यावर बोलणार आहे. हे धंदे सुरु आहेत ना ते बंद होणार आहेत. शिवसेना हाच महाराष्ट्र आहे. कुणीही येतो आणि महाराष्ट्राची बदनामी करतो. आता महाराष्ट्र उसळेल, अन्यायाविरुद्ध लढेल, नुसता लढणार नाही. आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचे वंश आहोत हे दाखवून देऊ, असा इशारा संजय राऊत यांनी दिला. शिवसेना भवनातील पत्रकार परिषदेला शिवसेनेचे खासदार, आमदार आणि पदाधिकारी उपस्थित राहणार, असेही राऊत यांनी सांगितले.

भाजपचे साडेतीन लोक कोठडीत असतील
महाराष्ट्रातसुद्धा सरकार आहे हे लक्षात घ्या. हे सरकार शिवसेनेच्या नेतृत्वात आहे हेही लक्षात घ्या आणि सरकार हे सरकार असते. पाहू कोणात किती दम आहे. आतापर्यंत खूप सहन केले, पण राजकारणातील मर्यादा आता भाजपने ओलांडली आहे. काही लोक हा जेलमध्ये जाईल, तो जेलमध्ये जाईल, अनिल देशमुखांच्या कोठडीच्या बाजूला जाईल असे बोलत आहेत. मात्र, मला असे वाटते की पुढील काही दिवसांत भाजपचे साडेतीन लोक हे अनिल देशमुखांच्याच कोठडीत असतील आणि अनिल देशमुख बाहेर असतील. या साडेतीन लोकांना कोठडीत ठेवण्याची तयारी सुरू आहे, असेही संजय राऊत यांनी सांगितले.

आत्ताशी टॉस झाला
संजय राऊतांच्या पत्रकार परिषदेविषयी विचारले असता, सामना तर होऊ द्या, आत्ताशी टॉस झाला आहे, अशी प्रतिक्रिया पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी दिली.

First Published on: February 15, 2022 5:15 AM
Exit mobile version