एमआयएमच्या प्रस्तावाने आघाडीत खळबळ, उघड किंवा छुपी युती अशक्य असल्याचे राऊतांचे वक्तव्य

एमआयएमच्या प्रस्तावाने आघाडीत खळबळ, उघड किंवा छुपी युती अशक्य असल्याचे राऊतांचे वक्तव्य

एमआयएमच्या प्रस्तावाने आघाडीत खळबळ, उघड किंवा छुपी युती अशक्य असल्याचे राऊतांचे वक्तव्य

औरंगाबाद महापालिकेच्या आगामी निवडणुकीत एमआयएमने राष्ट्रवादी काँग्रेससमोर युती करण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. या प्रस्तावावरून सत्ताधारी महाविकास आघाडीत खळबळ उडाली असून राष्ट्रवादीने एमआयएमला भाजपची बी टीम नसल्याचे आधी सिद्ध करा, असे आव्हान दिले आहे. तर शिवसेना नेते संजय राऊत यांनी एमआयएमशी उघड किंवा छुपी युती अशक्य असल्याचे सांगत एमआयएमचा प्रस्ताव उडवून लावला आहे.

औरंगाबादचे एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांच्या मातोश्रींच्या निधनाची बातमी समजताच सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी औरंगाबादला जाऊन जलील यांची सांत्वनपर भेट घेतली. या भेटी नंतर बोलताना जलील यांनी आपण राष्ट्रवादीला युतीचा प्रस्ताव दिल्याची माहिती दिली.

आमच्यावर नेहमीच भाजपची बी टीम म्हणून टीका केली जाते. पण आता आम्ही भाजपला हरवण्यासाठी तुम्हाला युतीची ऑफर दिली आहे. तुम्ही तुमची भूमिका सिद्ध करा. भाजपला हरवण्यासाठी आम्ही कोणत्याही पक्षासोबत युती करू शकतो, असे इम्तियाज जलील यांनी राष्ट्रवादीला उद्देशून स्पष्ट केले.

आधी भाजपची बी टीम नसल्याचे सिद्ध करा : जयंत पाटील

एमआयएमच्या युतीच्या प्रस्तवावर प्रतिक्रिया देताना जयंत पाटील यांनी टोपे आणि जलील यांच्यातील राजकीय चर्चेची शक्यता फेटाळून लावली. जलील यांच्या मातोश्रींचे निधन झाले म्हणून टोपे त्यांच्या घरी गेले होते. अशावेळी राजकीय चर्चा करणे अभिप्रेत नाही. निधन झाले असताना तिथे राजकीय चर्चा करणे ही राष्ट्रवादीची संस्कृती नाही. त्यामुळे अशा चर्चेवर प्रतिक्रिया देण्याची आवश्यकता वाटत नाही, असे पाटील यांनी स्पष्ट केले.

आत्तापर्यंत उत्तर प्रदेश, महाराष्ट्रात एमआयएम हा पक्ष भाजपचा बी टीम होता सिद्ध झाले आहे. ते बी टीम नसतील, तर मग आगामी औरंगाबाद महापालिका निवडणुकीत त्यांची भूमिका काय आहे, यावरून ते भाजपच्या पराभवासाठी उत्सुक आहेत की भाजपाच्या विजयासाठी उत्सुक आहेत हे आपल्या लक्षात येईल, असेही पाटील म्हणाले.

तर मीहाराष्ट्रात तीन पक्षांचेच सरकार आहे आणि तेच राहील. यात चौथा कोण पाचवा कोण यामध्ये तुम्ही कशाला पडला? असा सवाल संजय राऊत यांनी एमआयएमला केला आहे.

शिवसेना, काँग्रेस , राष्ट्रवादी हे पक्ष छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांच्या विचारांनी चालणारे पक्ष आहेत. एखाद्या पक्षाचे नेते औरंगजेबाच्या कबरीपुढे जाऊन गुढघे टेकतात आणि औरंगजेब त्यांचा आदर्श आहे . त्यामुळे ते महाराष्ट्राचे आदर्श होऊ शकत नाही. एमआयएम आणि भाजपची छुपी युती आहे हे उत्तर प्रदेश, पश्चिम बंगालमध्ये पाहिलेले आहे, असेही संजय राऊत यांनी सांगितले.

संजय राऊत यांच्या टीकेला इम्तियाज जलील यांंचे उत्तर

संजय राऊत यांच्या टीकेला इम्तियाज जलील यांनी उत्तर दिले आहे. भारतात आणि महाराष्ट्रात राहणारा सर्व मुस्लीम समाज शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांना आदर्श मानतो. त्यांची मक्तेदारी फक्त तुमची आहे हे विसरून जा. आम्ही छत्रपतींच्या नावाचा वापर कधीही आपल्या राजकीय स्वार्थासाठी केलेला नाही, असे जलील म्हणाले.


हेही वाचा : देवेंद्र फडणवीसांचा एमआयएमद्वारे महाविकास आघाडी तोडण्याचा डाव, शिवसेना नेते चंद्रकांत खैरेंचा आरोप

First Published on: March 19, 2022 10:06 PM
Exit mobile version