नोटीसा पाठवून ना सरकार पडणार, ना टपून बसलेल्या डोमकावळ्यांना फायदा होणार – राऊत

नोटीसा पाठवून ना सरकार पडणार, ना टपून बसलेल्या डोमकावळ्यांना फायदा होणार – राऊत

ईडीने राज्याचे परिवहन मंत्री अ‍ॅड. अनिल परब यांना चौकशीला हजर राहण्यासाठी नोटीस पाठवली आहे. यावर शिवसेनेचे खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत यांनी प्रतिक्रिया देताना नोटीसा पाठवून राज्यातील महाविकास आघाडी सरकार पडणार नाही, असं ठणकावून सांगितलं. तसंच अशा नोटीसांना आम्ही घाबरत नाही अन् अनिल परब यांची चिंता करु नका, असं राऊत म्हणाले.

संजय राऊत यांनी सोमवारी सकाळी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी अनिल परब यांना ईडीने पाठवलेल्या नोटीशीवर भाष्य केलं. “अनिल परब हे रत्नागिरीचे पालकमंत्री आहेत. पण ते पालकमंत्री आहेत, मंत्री आहेत त्याहीपेक्षा ते शिवसेनेचे आहेत. अशाने सरकार, शिवसेना कमजोर होईल, वाकेल, सरकारला तडे जातील आणि टपून बसलेले डोमकावळे आहेत, त्यांचा काही फायदा होईल, असं काहीही होणार नाही. असे अनेक घाव आम्ही पचवले आहेत. कायदेशी, बेकायदेशीर सगळ्या प्रकारचे…तेव्हा तुम्ही आमची चिंता अजिबात करु नये आणि अनिल परब यांची देखील चिंता करु नका,” असं संजय राऊत म्हणाले.

ईडीचा अधिकारी भाजप कार्यालयात असावा

“अनिल परब हे मंत्री आहेत. त्याहीपेक्षा ते शिवसेनेचे आमचे सहकारी आहेत. उपनेते आहेत. त्यांना नोटीस पाठवण्याचं टायमिंग जर आपण पाहिलं तर भाजपचे प्रमुख नेते हे सातत्याने अनिल परब यांचं नाव घेत होते. ईडीने त्यांचा एक अधिकारी भाजप कार्यालयात ठेवलाय किंवा भाजपने एखादा पदाधिकारी ईडीच्या कार्यालयात डेस्क अधिकारी म्हणून बसवला आहे. त्यामुळे हे सगळं होऊ शकतं. नाहीतर यांना कसं कळलं अनिल परब यांना नोटीस येते? यांना कसं कळलं की अनिल परब यांना या दिवशी नोटीस येणार? किरीट सोमय्या यांना कळतं, चंद्रकांत पाटलांना कळतं…काय चाललंय काय?” अशी संतप्त प्रतिक्रिया राऊत यांनी दिली.

 

First Published on: August 30, 2021 10:41 AM
Exit mobile version