ईडी भाजपची एटीएम मशीन

ईडी भाजपची एटीएम मशीन

ईडीचे मोठे अधिकारी भाजपाच्या तिकिटावर निवडणूक लढवत आहेत. विरोधकांच्या मागेच तुम्ही ईडीची कारवाई लावली आहे. पश्चिम बंगाल, महाराष्ट्रात हेच चित्र आहे. ईडी भाजपची एटीएम मशीन बनली आहे. त्यांच्या खंडणीबाबत संपूर्ण यादी मी पंतप्रधान कार्यालयात दिली आहे. मी पंतप्रधानांना लिहिलेल्या पत्रात तुमचे स्वच्छ भारत अभियान हे कचरा साफ करण्याचे नसून भ्रष्टाचार नष्ट करण्यासाठी तुमचा जयजयकार होत असल्याचे म्हटले आहे. अशा 10 भागांची माहिती मी त्यांना देणार आहे, असे म्हणत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पुन्हा एकदा भाजपवर पटलवार केला.संजय राऊत यांनी मंगळवारी शिवसेना खासदार अरविंद सावंत यांच्यासोबत शिवसेना भवनात पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांनी भाजपसह केंद्रीय यंत्रणांवर गंभीर आरोप केले.

महापालिकेच्या निवडणुका होईपर्यंत मुंबईच्या प्रत्येक प्रभागात आणि शाखेत प्राप्तिकर खात्याची धाड पडेल, असे मला वाटत आहे. शिवसेनेच्या नेतृत्वातील हे महाविकास आघाडी सरकार पाडण्यासाठी हे मोठे षड्यंत्र आहे. इन्कम आणि टॅक्स फक्त आमच्याचकडे आहे का? भाजपचे लोक मुंबईच्या रस्त्यांवर वाटी घेऊन भीक मागत आहेत का? ईडीच्या सर्वात जास्त कारवाया या महाराष्ट्रात होत आहेत. महाविकास आघाडीच्या १४ प्रमुख नेत्यांवर ईडीने कारवाई केली आहे. या सर्व कारवाया कोण नियंत्रित करत आहे, याबाबत शिवसेना लवकरच मोठा खुलासा करणार असल्याचे संजय राऊत म्हणाले.

किरीट सोमय्यांनी एका केंद्रीय मंत्र्यांच्या बोगस कंपन्यांची यादी ईडीला दिली आहे. भाजपाच्या जवळचे असणार्‍या ढवंगाळे यांच्या ७५ बोगस कंपन्यांची यादी मी ईडीकडे पाठवली होती. प्राप्तिकर विभाग आणि ईडीला आम्ही आतापर्यंत पुराव्यासोबत ५० नावे पाठवली आहेत. पण त्यावर चौकशी करावी असे या तपास यंत्रणांना का वाटत नाही? मागच्या पत्रकारिषदेमध्ये मी सुमीत कुमार नरवरचा उल्लेख केला होता. बुलंदशहरमध्ये राहणार्‍या या व्यक्तीची संपत्ती 8 हजार कोटींवर गेली आहे. ती व्यक्ती मलबार हिलला राहत असून ईडीला लावलेल्या चष्म्यातून अशा व्यक्ती दिसत नाहीत, असा आरोप राऊत यांनी केला.

नवलानी, ईडीच्या अधिकार्‍यांविरोधात एफआयआर
ईडीच्या अधिकार्‍यांचे जे खंडणी वसुलीचे रॅकेट आहे, त्याच्यामध्ये जो की फॅक्टर आहे, त्याचे नाव जितेंद्र चंद्रलाल नवलानी असे आहे. त्याच्या 7 वेगवेगळ्या कंपन्यांनी 100 हून अधिक बिल्डर्स आणि डेव्हलपर्सकडून खंडणी वसूल केली आहे. ज्या कंपन्यांचा ईडीने तपास केला. त्या कंपन्यांनी आपला पैसा नवलानीच्या कंपन्यांमध्ये ट्रान्सफर केला. नवलानी हे ईडीचे वरिष्ठ अधिकारी आहेत. डायरेक्टर, जॉइंट डायरेक्टर यांच्यासाठी काम करतात. नवलानी आणि ईडी अधिकार्‍यांच्या रॅकेटसंदर्भात मुंबईच्या पोलीस आयुक्तांना भेटून आम्ही एफआयआर दाखल केला आहे. मुंबई पोलीस या क्रिमिनल सिंडिकेटची आजपासून चौकशी सुरू करत आहे.

राकेश वाधवानशी माझा संबंध नाही– किरीट सोमय्या
माझा आणि राकेश वाधवान यांचा दमडीचाही संबंध नाही. शिवसेना खासदार संजय राऊत फक्त आरोप करतात. पण एकही कागद त्यांनी दिलेला नाही. राऊत नौटंकी करत आहेत. कारण कोविड घोटाळ्यात त्यांचे पार्टनर सुजीत पाटकर बुडाले आहेत. सीएमला पत्र लिहिले तर त्यांनी दखल का नाही घेतली? ईडी असो, सीबीआय, ईएडब्ल्यु नाहीतर सर्वोच्च न्यायालय असो सगळ्या ठिकाणी महाराष्ट्रातील घोटाळे घेऊन मी जातो, कारण माझ्या तक्रारीमध्ये दम असतो. तेव्हाच कारवाई होते.

ईडीचे मोठे अधिकारी भाजपचे तिकीट घेऊन निवडणूक लढवत असून ईडीच्या ज्या अधिकार्‍याने निवडणूक लढवली त्याने इतर ५० जणांचा खर्चही केला. ईडी भाजपची एटीएम मशीन बनली आहे, असा आरोप शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत केला. खंडणीखोरीच्या बाबतीतला सगळा कच्चाचिठ्ठा पंतप्रधान कार्यालयाला दिल्याची माहितीही त्यांनी दिली.

तुम्ही कितीही ताकद लावा, कितीही बदनामी करा, पण तुम्ही आमच्या केसालाही धक्का लावू शकणार नाहीत, अशा शब्दांत राऊत यांनी भाजपवर हल्ला चढवला. स्वच्छ भारत अभियान हे काही फक्त कचरा साफ करण्यासाठी नव्हे, तर भ्रष्टाचारही साफ करायला हवा, असा टोलाही राऊतांनी यावेळी भाजपला लगावला.

राऊत यांनी मंगळवारी शिवसेना भवनात पत्रकार परिषद घेत भाजप आणि केंद्रीय तपास यंत्रणांवर जोरदार हल्ला चढवला. त्यांनी यावेळी ईडी अधिकार्‍यांवर गंभीर आरोप केला. मागच्या काही वर्षांपासून ईडीच्या अधिकार्‍यांच्या दलालाचे एक जाळे बिल्डर, विकासक आणि कॉर्पोरेटरला धमकावण्याचे काम करीत आहे. जितेंद्र नवलानी हे सगळ्यात महत्वाचे नाव आहे. ६० कंपन्यांनी १०० पेक्षा जास्त लोकांकडून पैसे वसूल केले आहेत. यात रोख रक्कम आणि चेक पेमेंटही आहे. डिजिटल ट्रान्सफरही आहे. ज्या कंपन्यांची ईडीने चौकशी केली, त्या कंपन्यांनी ईडीचा पैसा वळता केला. हा नवलानी ईडीच्या मोठ्या अधिकार्‍यांसाठी काम करतो, असा दावा राऊत यांनी केला.

ईडीने दिवाण हाऊसिंग फायनान्सची २०१७ पासून चौकशी सुरू केली. जितेंद्र नवलानीच्या कंपनीला २५ कोटी वळते केले. मग ३१ मार्च २०२० पर्यंत वाधवानच्या कंपनीकडून नवलानीच्या कंपनीला पैसे गेले. अविनाश भोसलेंची चौकशी झाली. मग भोसलेंकडून नवलानीला १० कोटी वळते झाले. नवलानीच्या 7 कंपन्यांमध्ये कोट्यवधी रुपये वळवले गेले. १५ कोटी रुपयांबाबत अशाच एका चौकशी सुरु असलेल्या कंपनीकडून नवलानीला पैसे गेले. सिक्युरिटी ट्रान्सफर लोनच्या रुपात हे पैसे दिले गेले. फक्त नवलानीच नाही, तर ईडीचा असा सर्व पैसा हा ईडीच्या वेगवेगळ्या लोकांच्या कंपनीच्या खात्यात कॅश, चेक अशा वेगवेगळ्या स्वरुपात वळवला गेला. ईडीच्या कोणत्या अधिकार्‍याच्या खात्यात कुठे कसे पैसे गेले हे आपण हळूहळू सांगू , असेही राऊत म्हणाले.

ईडी अधिकार्‍यांच्या भ्रष्टाचार तसेच खंडणीबाबत आपण मुंबई पोलिसांकडे तक्रार देत असून त्यात चार ईडी अधिकार्‍यांसह नवलानीच्या नावाचाही समावेश आहे. मुंबई पोलीस आजपासून चौकशी करत आहेत. मुंबई पोलीस सक्षम आहेत, असा दावा करत राऊत यांनी एकप्रकारे केंद्रीय तपास यंत्रणांना आणि भाजपला इशाराही दिला. ईडीचा सगळ्यात मोठा घोटाळा मी आज तुमच्यासमोर आणला आहे. पुढच्या पत्रकार परिषदेत अधिकार्‍यांच्या नावासकट सर्वकाही सांगेन. या सगळ्याचा सूत्रधार कोण ते मी तुम्हाला सांगेन, असेही संजय राऊत म्हणाले.

First Published on: March 9, 2022 6:15 AM
Exit mobile version