नाशिकमधील सराफ बाजार आठ दिवस बंद

नाशिकमधील सराफ बाजार आठ दिवस बंद

प्रातिनिधीक फोटो

नाशिक शहरात कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत असून, गर्दीची ठिकाणे हॉटस्पॉट बनली आहेत. शहरातील बाजारपेठेत खरेदीसाठी आल्याने अनेक व्यक्ती कोरोनाबाधित झाल्याचे उघडकीस आले आहे. या पार्श्वभूमीवर कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी नाशिक सराफ असोसिएशनने ७ ते १४ जुलै या आठ दिवसांच्या कालावधीत सराफ बाजार बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

देशभर कोरोनाने मार्च महिन्यापासून धुमाकूळ घालण्यास सुरूवात केली आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी देशभर २३ मार्चपासून लॉकडाऊन करण्यात आले. मे महिन्यात लॉकडाऊन शिथील करण्यात आले. या तीन महिन्यांच्या कालावधीत नाशिक शहरातील बाजारपेठा बंद राहिल्याने त्याचा नाशिक शहरातील सराफ व्यापार्‍यांना फटका बसला असून त्यांचेे कोट्यावधी रूपयांचे नुकसान झाले. नाशिक शहरात २ हजार ८०० हून अधिक कोरोनाबाधित रूग्ण आढळून आले आहेत. त्यांच्या संपर्कात आलेले नातलग व नागरिकसुद्धा कोरोनाबाधित आढळून येत आहेत. वाढत्या रूग्णसंख्येमुळे आरोग्य विभाग हादरला असून, नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. शहरात सार्वजनिक ठिकाणे कोरोनाचे हॉटस्पॉट झाले आहेत. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सराफ व्यापार्‍यांनी ७ ते १४ जुलै या कालावधीत सराफ बाजार बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

कोरोनाचा रोखण्यासाठी उचलले पाऊल
नाशिक शहरात कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी आणि ग्राहकांचे आरोग्यहित लक्षात घेवून ७ ते १४ जुलै या आठ दिवसांच्या कालावधीत सराफ बाजार बंद राहणार आहे. १५ जुलैपासून सराफ बाजार सुरू होईल.
चेतन राजापूरकर अध्यक्ष, नाशिक सराफ असोसिएशन

First Published on: July 5, 2020 6:58 PM
Exit mobile version