सावित्रीबाई फुले यांची जयंती ‘शिक्षिका दिन’

सावित्रीबाई फुले यांची जयंती ‘शिक्षिका दिन’

नाशिक : क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती ‘शिक्षिका दिन’ म्हणून साजरी करण्याचा निर्णय सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने घेतला आहे. विद्यापीठाचे सिनेट सदस्य विजय सोनवणे यांनी मांडलेल्या ठरावास बहुमाताने मंजूरी देण्यात आली. येत्या ३  जानेवारी रोजी पहिला शिक्षिका दिन साजरा होत असून, विद्यापीठामार्फत संलग्न महाविद्यालयांना यांसदर्भात परिपत्रक पाठवले जाणार आहे.

पुणे विद्यापीठाची अधिसभा (सिनेट) सदस्यांची बैठक बुधवार (दि. २८) रोजी पार पडली. यावेळी विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू डॉ. कारभारी काळे, प्र. कुलगुरू डॉ. संजीव सोनवणे, कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार उपस्थित होते. अधिसभा सदस्य सागर वैद्य यांनी जी-२० चा फायदा विद्यार्थी, स्टार्टअप सुरू करणार्‍या नवद्योजकांना, संशोधकांना व्हावा, अशी मागणी केली. यासाठी प्रचार, प्रसार कार्यक्रम करणारी उपक्रम समिती स्थापन करण्याची मागणी त्यांंनी केली. अधिसभा आणि कुलगुरूंनी एकमताने या समिती स्थापनेला मंजुरी दिली.

यानंतर राहुल पाखरे यांनी परीक्षा आणि प्रवेश विभागातील गोंधळ, विद्यार्थ्यांना होणारा त्रास यावरून प्रस्ताव मांडला. एक खिडकी योजना, अ‍ॅप्लिकेशन ट्रॅक सिस्टीम सुरू करण्याची सूचना केली. या विषयावरून अधिसभा सदस्य प्रसेनजीत फडणवीस, डॉ. अपूर्व हिरे, बागेश्री मंठाळकर, सचिन गोर्डे आदींनी प्रशासनाला धारेवर धरले. विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी तत्काळ एक समिती स्थापन करण्याचा निर्णय कुलगुरूंनी जाहीर केला.

उपकेंद्राला पुन्हा बुस्ट

यंदा विद्यापीठाचा अर्थसंकल्पात ७९ कोटींची वाढीव तरतूद करण्यात आली आहे. या रक्कमेतून विद्यापीठाच्या नाशिक, अहमदनगर येथील उपकेंद्रासाठी अधिकची तरतूद करावी, अशी सूचना सागर वैद्य यांनी केली.

शैक्षणिक क्षेत्रात सावित्रीबाई फुले यांचे योगदान सर्वश्रुत आहे. पुणे येथील पहिल्या महिला शिक्षिका आणि पुणे विद्यापीठाला त्यांचे नाव आहे. तर त्यांच्या नावाने राज्यभरात शिक्षिका दिन साजरा व्हायला हवा. यासंदर्भात राज्य सरकारकडेही आम्ही पाठपुरावा करणार आहोत. – विजय सोनवणे, अधिसभा सदस्य (पुणे विद्यापीठ)

First Published on: December 29, 2022 10:43 AM
Exit mobile version