मंत्रालयात बोगस नोकऱ्यांचा सुळसुळाट, धनंजय मुंडेंच्या नावाखाली तरुणाची सात लाखांची फसवणूक

मंत्रालयात बोगस नोकऱ्यांचा सुळसुळाट, धनंजय मुंडेंच्या नावाखाली तरुणाची सात लाखांची फसवणूक

Jobs Scam in Mantralay | मुंबई – मंत्रालयात उपसचिवांच्या दालनात क संवर्गातील लिपिक वर्गासाठी बोगस भरती प्रक्रिया डिसेंबर महिन्यात राबवण्यात आली होती. याप्रकरणाची सखोल चौकशी सुरू असतानाच मंत्रालयातील आणखी एका बोगस भरतीचा पर्दाफाश झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्या नावाचा वापर करून मंत्रालयात बोगस भरती राबवली असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मंत्रालयातील कर्मचारीच हे बनावट लिपिक भरती रॅकेट चालवत असल्याचं तपासातून समोर आलं आहे. याप्रकरणी गोवंडी पोलीस ठाण्यात मंत्रालयातील एका कर्मचाऱ्यासह तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निखिल माळवे, शुभम मोहिते आणि नीलेश कुडतरकर अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत.

कशी झाली फसवणूक?

मुंबई महापालिकेतून सेवानिवृत्त झालेले यशवंत कदम (६७) यांच्या एम.एस्सी झालेल्या रत्नजित याला व्हॉट्सअॅपवर सरकारी नोकरीसंदर्भात जाहिरात मिळाली. त्याने त्या जाहिरातीनुसार निखिल माळवे याच्याशी संपर्क केला. मंत्रालयातील सामाजिक न्याय विभागात लिपिकपदावर नोकरी लावण्याचे आमिष निखिल माळवे याने दिले. मुलाखतीसाठी त्याने आधी ३० हजारांची मागणी केली.

शुभम मोहिते हा मुंडे यांच्या कार्यालयातील शिपाई असल्याचं भासवून त्याची भेट घालून दिली. तसंच, कांबळे नावाच्या व्यक्तीला भेटून कागदपत्रे देण्यात आली. कागदपत्रांची छाननी झाल्यानंतर १ डिसेंबर २०२१ रोजी धनंजय मुंडे यांच्या नावाचे बनावट आदेशपत्र रत्नजितला मेल करण्यात आला. तात्पुरत्या स्वरुपात निवड झाली असून २९ जानेवारी २०२२ पर्यंत कार्यालयात उपस्थित राहून नोकरी आदेशप्राप्त करून सेवेला प्रारंभ करा, असे निर्देश या मेलद्वारे करण्यात आला होता. त्यामुळे रत्नजितला नोकरीबाबत विश्वास निर्माण झाला.

हेही वाचा मंत्रालयात बोगस भरतीप्रकरणी दोषींना शिक्षा, फसलेल्या तरुणांना न्याय द्यावा, अजित पवारांची मागणी

मेला मिळाल्यानंतर, ठरलेल्या दिवशी रत्नजित मंत्रालयात गेला, मात्र, शुभमचा फोन नॉट रिचेबल लागला. तो धनंजय मुंडे यांच्यासोबत दौऱ्यावर गेला असल्याचीही बतावणी करण्यात आली. त्यानंतर, याप्रकरणात निलेश कुडतरकर नामक व्यक्तीने एन्ट्री घेऊन नोकरीचे काम १०० टक्के होणार असल्याचे आश्वासन दिले. परंतु, वारंवार टाळाटाळ होत असल्याचे निर्दशनास येताच त्याने पोलिसांत धाव घेतली.

नोकरीच्या आमिषाने सात लाख उकळण्यात आले आहेत. हे सात लाख भरण्याकरता रत्नजितच्या वडिलांनी आपली जमापुंजी पणाला लावली. एवढंच नव्हे तर आईचे सर्व दागिने गहाण ठेवून सात लाख तीस हजार रुपये जमा केले. आता सध्या पेन्शनमधून व्याजाचे हप्ते जात असल्याची हतबलता रत्नजितचे वडील यशवंत कदम यांनी बोलून दाखवली.

सोशल मीडियाचा वापर

रत्नजितचा विश्वास संपादन करण्यासाठी आरोपींनी सोशल मीडियाचा वापर केला होता. धनंजय मुंडे यांच्यासोबतचा फोटो सोशल मीडियावर शेअर करत आणि डिपीला लावत त्यांनी रत्नजितचा विश्वास संपादन केला.

First Published on: February 15, 2023 12:09 PM
Exit mobile version