शिष्यवृत्तीची परीक्षा ८ ऐवजी ९ ऑगस्टला

शिष्यवृत्तीची परीक्षा ८ ऐवजी ९ ऑगस्टला

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे अध्यक्ष तुकाराम तुपे यांनी राज्यातील पाचवी आणि आठवीची शिष्यवृत्ती परीक्षेची तारीख बदलली असल्याची माहिती दिली आहे. आता शिष्यवृत्ती परीक्षा 9 ऑगस्टला होणार आहे. 8 ऑगस्टला राज्यात केंद्रीय पोलीस बलाची परीक्षा होत असल्याने परीक्षा पुढे ढकलली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने इयत्ता पाचवी व आठवीची शिष्यवृत्ती परीक्षा लांबणीवर टाकली होती.

राज्य परीक्षा परिषदेतर्फे दरवर्षी फेब्रुवारीमध्ये शिष्यवृत्ती परीक्षा घेतली जाते. कोरोना रुग्ण संख्या कमी झाल्यामुळे आता ही परीक्षा येत्या 8 ऑगस्ट रोजी घेण्यात येणार होती आता ती 9 ऑगस्टला होईल. सर्वसाधारणपणे दरवर्षी पाचवी आणि आठवीचे सुमारे 10 लाखांहून अधिक विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षेसाठी नोंदणी करतात. परंतु, यंदा कोरोनामुळे परीक्षा देणार्‍या विद्यार्थी संख्येत घट झाली आहे.

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या पूर्वनियोजनाप्रमाणे पाचवी आणि आठवीच्या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती परीक्षा 25 एप्रिलला आयोजित केली जाणार होती. मात्र, शालेय शिक्षण विभागाकडून प्राप्त झालेल्या पत्रानंतर परीक्षा परिषदेने ही परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय जाहीर केला आहे. शालेय शिक्षण विभागाने 23 मे ही नवीन तारीख निश्चित केली होती. मात्र, कोरोनाची दुसरी लाट लक्षात घेता परीक्षा लांबणीवर टाकली गेली होती.

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने दरवर्षी फेब्रुवारी महिन्यात शिष्यवृत्ती परीक्षेचे आयोजन केले जाते. मात्र, कोरोनामुळे परीक्षा पुढे ढकलली होती.

First Published on: July 28, 2021 4:45 AM
Exit mobile version