खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी खुशखबर; शिष्यवृत्तीसाठी येथे अर्ज करा

खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी खुशखबर; शिष्यवृत्तीसाठी येथे अर्ज करा

प्रातिनिधिक फोटो

उच्च आणि तंत्र शिक्षण विभागामार्फत राज्यातील खुल्या प्रवर्गातील गुणवंत विद्यार्थ्यांसाठी उच्च शिक्षण विभागाची शिष्यवृत्ती मिळणार आहे. जे गुणवंत विद्यार्थी पदव्युत्तर पदवी, पदव्युत्तर पदविका आणि पीएचडी अभ्यासक्रमासाठी टीएचई किंवा क्युएस रँकीग २०० च्या आतील विविध देशातील शैक्षणिक संस्थेमध्ये प्रवेश घेतील अशा २० विद्यार्थ्यांना राज्य शासनाकडून दरवर्षी शिष्यवृत्ती मंजूर करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ही योजना उच्च आणि तंत्र शिक्षण विभागांतर्गत ‘गुणवंत मुलामुलींना परदेशात उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती’ मंजूर करणे या नावाने शैक्षणिक वर्ष २०१८-१९ पासून राबविण्यात येणार आहे.

या शाखेतील विद्यार्थ्यांना मिळणार शिष्यवृत्ती

विविध शिक्षण शाखेनुसार विद्यार्थ्यांची अभ्यासक्रमनिहाय विद्यार्थी संख्यांमध्ये कला शाखा – २, वाणिज्य शाखा – २, विज्ञान शाखा – २, व्यवस्थापन शाखा – २, विधी अभ्यासक्रम – २, अभियांत्रिकी आणि वस्तू कला शास्त्र – ८ आणि औषधनिर्माणशास्त्र – २ याप्रमाणे विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती प्रदान करण्यात येणार आहे.

या संकेतस्थळावरुन करा ऑनलाईन अर्ज

या आर्थिक वर्षासाठी राज्य शासनामार्फत २० कोटी रुपयांचा निधी या योजनेसाठी उपलब्ध करुन देण्यात आला आहे. या योजनेंतर्गत विद्यार्थ्यांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक विद्यार्थ्यांनी www.dtemaharashtra.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन पध्दतीने अर्ज भरणे आवश्यक असून या अर्जासोबत आवश्यक प्रमाणपत्रे अपलोड करणे आवश्यक आहे. ऑनलाईन अर्जाशिवाय इतर कोणत्याही पध्दतीने केलेला अर्ज विचारात घेण्यात येणार नाही.

First Published on: October 15, 2018 6:03 PM
Exit mobile version