दहावी-बारावी वगळता नगर जिल्ह्यात महिनाभरासाठी शाळा बंद!

दहावी-बारावी वगळता नगर जिल्ह्यात महिनाभरासाठी शाळा बंद!

अहमदनगर जिल्ह्यात कोरोना रुग्णसंख्येचा सोमवारी सर्वात मोठा आकडा समोर आला. जिल्ह्यात 1347 नागरिकांना कोरोनाची बाधा झाली. या पार्श्वभूमीवर नगरचे जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांनी दहावी व बारावीचे वर्ग वगळता जिल्ह्यातील सर्व खाजगी व सरकारी शाळा बंद ठेवण्याचे आदेश काढले आहेत. मंगळवारपासून 30 एप्रिल पर्यंत या शाळा बंद राहतील.

जिल्ह्यामध्ये दररोज बाधितांच्या संख्येत मोठी वाढ होत असून आता प्रशासनानेदेखील नियमातील शिथिलता कमी करून कडक पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी शासनाने लागू केलेल्या नियमावलीचा नागरिकांकडून सातत्याने भंग होत असल्याने रुग्णसंख्येत वाढ होताना दिसते. या पार्श्वभूमीवर आता नगर जिल्हा लॉकडाऊनच्या दिशेने जात आहे. ही वाढ अशीच राहिली तर पुन्हा लॉकडाऊनचा धोका कायम आहे. जिल्हाधिकारी भोसले यांनी त्यादृष्टीने पहिले पाऊल टाकले असून आता महिनाभरासाठी शाळा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

सोमवारी दुपारपर्यंत अहमदनगर जिल्ह्यात आढळलेली रुग्णसंख्या पुढीलप्रमाणे :

अहमदनगर शहर – 453
राहाता – 116
कोपरगाव – 102
पाथर्डी – 92
संगमनेर – 90
श्रीरामपूर – 75
नगर ग्रामीण – 68
शेवगाव – 66
जामखेड – 60
श्रीगोंदा – 60
राहुरी – 49
भिंगार कॅन्टोन्मेंट – 26
पारनेर – 26
अकोले – 21
नेवासे – 18
कर्जत – 07
मिलिटरी हॉस्पिटल – 03
जिल्ह्याबाहेरील रुग्णसंख्या – 15

पालकमंत्री हसन मुश्रीफ यांची पत्रकार परिषद

लसीकरणासाठी केंद्र सरकारने वयाची अट काढून टाकावी, तसेच लसीकरण बंधनकारक करावे अशी मागणी नगर जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी केली आहे. लॉकडाऊनबाबत राज्य सरकारने अद्याप निर्णय घेतलेला नसून नगर जिल्ह्यात राज्य शासनाच्या सूचनेनुसार विविध उपाययोजना करण्यात येत आहे. जिल्ह्यात रेमडेसीवीरचा साठा कमी असून हा साठा मिळण्याबाबत वरिष्ठ पातळीवर पाठपुरावा सुरु आहे. नागरिकांनी, लोकप्रतिनिधींनी मास्क वापर, गर्दी टाळणे या नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. सोमवारी नगरच्या दौर्‍यावर आलेल्या पालक मंत्री मुश्रीफ यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.

नगर जिल्ह्यात दहावी व बारावी वगळता सर्व शाळा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीत गर्दी टाळण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. जिल्ह्यातील सर्व हॉटेल, रेस्टॉरंट रात्री आठनंतर पूर्ण बंद राहणार आहे. कोविडचा प्रादुर्भाव लक्षात घेऊन पुढील 100 दिवसांचे नियोजन करण्यात आले आहे.  – डॉ. राजेंद्र भोसले, जिल्हाधिकारी, अहमदनगर

First Published on: March 29, 2021 11:58 PM
Exit mobile version