तिकीट वाटपानंतर सेना-भाजपत आऊटगोईंग

तिकीट वाटपानंतर सेना-भाजपत आऊटगोईंग

Maharashtra Assembly Monsoon Session live 2022 congress nana patole slams cm eknath shinde devendra fadanvis on maharashtra heavy rain marathwada

सध्या काँग्रेस, राष्ट्रवादीत गडबड सुरु आहे. पण ही कायम राहणार नाही. थोडे दिवस थांबा, एकदा का तिकीट वाटप सुरु झाले मग पहा. जी गडबड आमच्या पक्षात सुरु आहे, ती तुम्हाला शिवसेना आणि भाजपत पहायला मिळेल, असे भाकित सोमवारी विधान सभा निवडणूक काँग्रेस प्रचारप्रमुख नाना पटोले यांनी मुंबईत केले. त्यांनी यावेळी पुन्हा एकदा केंद्र सरकारवर निशाणा साधत नरेंद्र मोदींवर देखील टीका केली. आपल्याकडे सर्व चांगले चालले असल्याचे दाखवित मोदी अमेरिकेत दौरा करीत असल्याची टीका देखील त्यांनी यावेळी केली.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या काही दिवसांपूर्वी गाजलेल्या एक्सिस बँक प्रकरणाची चौकशीची मागणी करण्यासाठी नाना पटोले यांनी पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. पटोले म्हणाले की, पोलिसांच्या पगाराची खाती अ‍ॅक्सिस बँकेकडे वर्ग करताना मुख्यमंत्र्यांनी पदाचा दुरुपयोग केला असून मुख्यमंत्र्यांनी तात्काळ पदाचा राजीनामा द्यावा आणि चौकशीला सामोरे जावे. राष्ट्रवाद हा निवडणुकीचा मुद्दा कसा असू शकतो, असा प्रश्न त्यांनी यावेळी उपस्थित केला.

तर राष्ट्रवाद आमच्या पक्षाला शिकवण्याची गरज नसून देशाला स्वतंत्रच मुळात गांधी घराण्याने मिळवून दिले आहे, असे पटोले म्हणाले.

सध्या काही जण इनकमिंगच्या माध्यमातून काही जणांना संपविणारे होत आहेत. एकदा का तिकीट वाटप होऊ दे त्यानंतर संपविणारेच संपणार आहेत, असा टोला देखील त्यांनी यावेळी लगावला. महाजनादेश यात्रेच्या विरोधात काढण्यात आलेल्या महापदार्फाश यात्रेबद्दल त्यांना विचारणा केली असता ते म्हणाले की, मुळात ही यात्रा थोडी उशीरा काढण्यात आली होती. म्हणून तिला म्हणावा तितका वेळ मिळाला नाही. पण जेव्हा आम्ही ही यात्रा काढली, त्याचा उद्देश नक्कीच सार्थ झाला असून या यात्रेला कोणत्याही प्रकारचा अतंर्गत वादाचा फटका बसलेला नाही.

पेट्रोल पंपांवरील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे फलक काढा-काँग्रेसची मागणी
मुंबई – विधानसभा निवडणुकांसाठी आचारसंहिता लागू झाल्याने विविध राजकीय पक्षांचे फलक प्रशासनाकडून काढण्यात येत आहेत. विरोधी पक्षांच्या फलकाप्रमाणेच राज्यभरातील पेट्रोलपंपावर लावलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे फलक तसेच इतर सरकारी जाहिरातींचे फलक तात्काळ काढावेत अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस प्रदेश कमिटीचे सरचिटणीस आणि प्रवक्ते सचिन सावंत यांनी राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकार्‍यांकडे पत्र लिहून केली आहे. यासंदर्भात सावंत म्हणाले की, निवडणूक आयोगाने विधानसभा निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला आहे. निवडणुकीच्या घोषणेनंतर राज्यभरात आदर्श आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. आचारसंहिता लागू झाल्याने प्रशासनाने विविध राजकीय पक्षांचे परवानग्या घेऊन लावलेले फलक काढले आहेत. आचारसंहितेनुसार फलक काढण्यावर कुणाचाही आक्षेप नाही, पण या नियमानुसार सर्वच राजकीय फलक निवडणूक आयोगाने काढणे अपेक्षित आहे. पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे छायाचित्र असलेले फलक आजही राज्यातील बहुतांश पेट्रोलपंपांवर लावलेले आहेत. त्यामुळे त्यांनी ही मागणी केली आहे.

First Published on: September 24, 2019 6:01 AM
Exit mobile version