Sena Vs Sena : व्हिडीओ शेअर करत शिंदे गट म्हणतो, श्रीकांत शिंदे फाऊंडेशनला आणखी बळ मिळो आणि…

Sena Vs Sena : व्हिडीओ शेअर करत शिंदे गट म्हणतो, श्रीकांत शिंदे फाऊंडेशनला आणखी बळ मिळो आणि…

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचे श्रीकांत शिंदे फाऊंडेशन सध्या वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी या संस्थेच्या कार्यक्रमांवर आक्षेप घेत, चौकशी करण्याची मागणी केली आहे. यासंदर्भात त्यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र पाठवले आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेनेने एक व्हिडीओ ट्वीट करत, संजय राऊत यांना अप्रत्यक्षपणे टोला लगावला आहे. (Sena Vs Sena: War of words between Thackeray group and Shinde group over Srikant Shinde Foundation)

श्रीकांत शिंदे फाऊंडेशनच्या माध्यमातून सामाजिक, सांस्कृतिक कार्य होत असेल तर त्यास आक्षेप असण्याचे कारण नाही. या फाऊंडेशनतर्फे अनेक शैक्षणिक, वैद्यकीय, सामाजिक, धार्मिक, सांस्कृतिक उपक्रम घेतले जातात आणि ते अत्यंत भव्य स्वरूपात होतात. ते कार्य कौतुकास्पद आहेच, पण या भव्य उपक्रमावर आतापर्यंत खर्च झालेल्या कोट्यवधी रुपयांचे स्रोत काय? या कार्यासाठी ज्यांनी कोट्यवधी रुपये दिले ते दानशूर कोण? याची माहिती नागरिकांना मिळणे गरजेचे आहे, असे राऊत यांनी पंतप्रधान मोदी यांना पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे.

श्रीकांत शिंदे फाऊंडेशनचे संबंध राज्याच्या मुख्यमंत्र्यांशी असल्याने त्याबाबतचे सर्व व्यवहार हे पारदर्शक पद्धतीने होणे गरजेचे होते. पण या फाऊंडेशनसाठी मुख्यमंत्री कार्यालयात विशेष कक्ष उघडला आहे आणि त्या माध्यमातून बिल्डर, ठेकेदारांकडून रोखीत रकमा घेतल्या जातात. आतापर्यंत किमान 500 कोटी रुपये या माध्यमातून जमा केले आहेत, असा थेट आरोप खासदार संजय राऊत यांनी केला आहे. तर, जे लोक पत्राचाळीचे आरोपी आहेत, जे लोक जेलमध्ये जाऊन आले आहेत तेच आता पत्र लिहित आहेत, असा पलटवार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी केला आहे.

त्यापाठोपाठ आता एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने एका लहान मुलाचा व्हिडीओ शेअर करत संजय राऊत यांचे थेट नाव न घेता प्रत्युत्तर दिले आहे. डॉ. श्रीकांत शिंदे फाऊंडेशनमुळे वयाच्या आठव्या वर्षी विजेच्या धक्क्याने हात पाय गमावलेल्या या मुलाला नवे आयुष्य मिळाले. अशाच प्रकारे शेकडो मुलांना नवजीवन देणाऱ्या डॉ. श्रीकांत शिंदे फाऊंडेशनला या कामात आणखी बळ मिळो आणि त्यांची उत्तरोत्तर प्रगती होवो, हीच सदिच्छा, असे ट्वीट शिवसेनेने केले आहे.

हेही वाचा – Sanjay Raut : मुख्यमंत्री कार्यालयातून 500 कोटी गोळा केले, संजय राऊतांचा श्रीकांत शिंदेवर आरोप


Edited by – Manoj S. Joshi

First Published on: April 15, 2024 3:57 PM
Exit mobile version