ज्येष्ठ रंगकर्मी, साहित्यिक रत्नाकर मतकरी यांचे निधन!

ज्येष्ठ रंगकर्मी, साहित्यिक रत्नाकर मतकरी यांचे निधन!

ratnakar matkari

ज्येष्ठ रंगकर्मी आणि साहित्यिक रत्नाकर मतकरी यांचे मुबंईत निधन झाले. वयाच्या ८१ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही दिवसांपासून मतकरी यांना थकवा जाणवत होता. आरोग्य तपासणीसाठी त्यांना गोदरेज रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर त्यांना सेव्हन हिल्स रूग्णालयात हलिवण्यात आले. तिथेच त्यांची प्राणज्योत मालवली. १९५५ मध्ये वयाच्या सतराव्या वर्षी त्यांची वेडी माणसं ही त्यांची कथा आकाशवाणीवर प्रदर्शित झाली. त्यानंतर त्यांच्या अंसख्य कथा आणि पुस्तकं प्रदर्शित झाली. ज्येष्ठ साहित्यिक, नाटककार, रंगकर्मी , आणि राष्ट्रीय पुरस्कार विजेते चित्रपट दिग्दर्शक रत्नाकर मतकरी अशी त्यांची ओळख आहे.

मतकरींची ‘लोककथा ७८’, ‘दुभंग’, ‘अश्वमेध’, ‘माझं काय चुकलं?’, ‘जावई माझा भला’, ‘चार दिवस प्रेमाचे’, ‘घर तिघांचं हवं’, ‘खोल खोल पाणी’, ‘इंदिरा ‘, आणि इतर अनेक नाटके नाट्य रसिकांच्या मनात कायम घर करुन आहेत. त्याचबरोबर अलीकडेच ‘अलबत्या गलबत्या’ आणि ‘निम्मा, शिम्मा राक्षस’ या मुलांच्या, तसच महाभारतातल्या अंतिम पर्वावर आधारित ‘आरण्यक’ या नाटकांनी रसिक प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं. त्याचप्रमाणे रत्नाकर मतकरी यांच्या गुढकथा विशेष गाजल्या.

मोठ्यांसाठी सत्तर तर मुलांसाठी बावीस नाटकं, अनेक एकांकिका, वीस कथासंग्रह, तीन कादंबऱ्या, बारा लेख संग्रह, आपल्या रंगभूमीवरल्या कामाचा सखोल विचार करणारा आत्मचरित्रात्मक ग्रंथ ‘माझे रंगप्रयोग’ अशी त्यांची विपुल साहित्यसंपदा आहे. ‘गहीरे पाणी’, ‘अश्वमेध’, ‘बेरीज वजाबाकी’ या मालिका, तसच सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्कार मिळालेला चित्रपट ‘इन्वेस्टमेन्ट’, अशी त्यांची इतर माध्यमामधली कामंही रसिकप्रिय ठरली आहेत.

रत्नाकर मतकरींना विपुल पुरस्कार आणि सन्मान मिळालेले आहेत. संगीत नाटक अकादेमी आणि साहित्य ॲकेडमी या दोन्ही मान्यवर संस्थांकडून पुरस्कारप्राप्त ठरलेल्या मोजक्या व्यक्तीमत्वात त्यांचा समावेश होतो. रत्नाकर मतकरींच्या पश्चात निर्मिती आणि अभिनयाच्या क्षेत्रात काम करणाऱ्या त्यांच्या पत्नी प्रतिभा मतकरी, कन्या अभिनेत्री सुप्रिया विनोद, पुत्र लेखक/समीक्षक गणेश मतकरी, जावई डाॅ. मिलिंद विनोद, स्नुशा आर्किटेक्ट पल्लवी मतकरी आणि नातवंडे, असा परिवार आहे. मतकरींच्या जाण्याने साहित्य आणि रंगभूमी या क्षेत्रात एक न भरुन येणारी पोकळी निर्माण झाली आहे.

First Published on: May 18, 2020 8:46 AM
Exit mobile version