पुणे-नाशिक मार्गावर अपघातांची मालिका सुरूच

पुणे-नाशिक मार्गावर अपघातांची मालिका सुरूच

संगमनेर : तालुक्यातून जाणार्‍या नवीन पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावर अपघातांचा सिलसिला सुरूच असल्याचे पाहायला मिळत आहे.महामार्गावरील कुरकुंडी शिवारात महामार्गाच्या कडेला साईडगटारात गुरुवारी (दि.२४) नोव्हेंबर रोजी मध्यरात्रीनंतर दीड ते दोन वाजेच्या सुमारास कार उलटली. या अपघातात सुदैवाने चौघेजण बालंबाल बचावले असून, कारचे मोठे नुकसान झाले आहे.

घारगाव पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कुरकुंडी शिवारातील वायाळवाडी येथे गुरुवारी मध्यरात्रीनंतर दीड ते दोन वाजेच्या सुमारास महामार्गाच्या कडेला असलेल्या साईडगटारीत कार उलटली आहे. कार उलटल्याची माहिती समजताच घारगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुनील पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेडकॉन्स्टेबल कैलास देशमुख, चालक संतोष फड यांनी घटनास्थळी धाव घेतली.केवळ दैव बलवत्तर असल्याने चौघेजण बालंबाल बचावले आहेत. सकाळी डोळासणे महामार्गाचे सहायक पोलीस निरीक्षक सचिन सूर्यवंशी, सुनील साळवे, मनेष शिंदे, नंदकुमार बर्डे, अरविंद गिरी, योगीराज सोनवणे यांनीही घटनास्थळी धाव घेतली होती. या अपघातात कारचे मोठे नुकसान झाले आहे. दरम्यान, महामार्गावर अनेक ठिकाणी मोठमोठे खड्डे पडलेले असल्याने वारंवार अपघात होत आहे. तर वाहनचालकांकडूनही वाहतूक नियमांचे सर्रासपणे उल्लंघन होवूनही अपघातांच्या संखेत भर पडत असल्याचे समोर येत आहे. यावरुन महामार्गावर अपघातांची मालिका सुरूच असल्याचे दिसत आहे.

First Published on: November 25, 2022 11:21 AM
Exit mobile version