आमदार यड्रावकरांना भाजपसोबत राहण्यासाठी रश्मी शुक्लांनी दबाव आणला; आव्हाडांचा गंभीर आरोप

आमदार यड्रावकरांना भाजपसोबत राहण्यासाठी रश्मी शुक्लांनी दबाव आणला; आव्हाडांचा गंभीर आरोप

आमदार यड्रावकरांना भाजपमध्ये राहण्यासाठी रश्मी शुक्लांनी दबाव आणला; आव्हाडांचा गंभीर आरोप

सध्या फोन टॅपिंग प्रकरणामुळे चर्चेत असलेल्या रश्मी शुक्ला यांच्यावर गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी गंभीर आरोप केले आहेत. रश्मी शुक्ला या राज्य गुप्त विभागाच्या तत्कालीन आयुक्त असताना अपक्ष आमदार राजेंद्र यड्रावकर यांना भाजपसोबत राहण्यासाठी धमकावलं होतं, असा गौप्यस्फोट आव्हाड यांनी केला आहे. जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट करत हा गंभीर आरोप केला आहे.

शिरोळचे अपक्ष आमदार राजेंद्र यड्रावकर यांनी महाविकास आघाडीमध्ये न जाता भाजपबरोबर रहावं यासाठी रश्मी शुक्ला यांनी त्यांची वैयक्तिक भेट घेतली, त्यांना फोन केले व त्यांच्यावर दबाव आणण्याचा देखील प्रयत्न केला होता, असं आव्हाड त्यांच्या ट्विटमध्ये म्हणाले आहेत. असं ट्विट करत अजून पुरावे काय पाहिजेत, असा सवाल आव्हाड यांनी व्यक्त केला. जितेंद्र आव्हाड यांच्या आरोपानंतर रश्मी शुक्ला आणि भाजप काय उत्तर देणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.

कोण आहेत राजेंद्र पाटील-यड्रावकर?

राजेंद्र पाटील-यड्रावकर हे कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ विधानसभेतील अपक्ष आमदार आहेत. महाविकास आघाडीमध्ये यड्रावकर यांनी शिवसेनेला पाठिंबा दिला आहे. महाराष्ट्र सरकारमधील सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण, वैद्यकीय शिक्षण, अन्न आणि औषध प्रशासन, वस्त्रोद्योग, सांस्कृतिक कार्य या विभागाचे राज्यमंत्रिपद राजेंद्र पाटील-यड्रावकर यांना देण्यात आलं आहे.

 

First Published on: March 25, 2021 2:46 PM
Exit mobile version