सीरम इन्स्टिट्यूटची नवी Corona Vaccine लवकरच उपलब्ध होणार!

सीरम इन्स्टिट्यूटची नवी Corona Vaccine लवकरच उपलब्ध होणार!

सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने कोरोनावरील कोविशील्ड लस बाजारात उपलब्ध करून दिल्यानतंर आता नोव्हावॅक्स या लसीची मानवी चाचणी घेण्यात येणार असल्याचे सांगितले जात आहे. सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे मुख्य कार्यकारी अदर पूनावला यांनी दिलेल्या माहितीनुसार, ब्रिटनमध्ये मानवी चाचण्या दरम्यान नोव्हावॅक्सची लस ८९ टक्के सुरक्षित आहे. हे समजल्यानंतर स्थानिक अधिकाऱ्यांना देशांतर्गत पातळीवर मानवी चाचण्या घेण्याबाबत अर्ज देण्यात आला आहे. नोव्हावाक्स लसीच्या चाचणीबाबत लवकरच निर्णय घेण्यात येईल, अशी कंपनीला अपेक्षा आहे.

असं म्हणाले पूनावाला…

नोव्हावॅक्स लसीची फेज III ची मानवी चाचणी १५ हजार स्वयंमसेवकांवर घेण्यात आली. या चाचणीत १८ ते ८४ वय वर्ष असलेल्या स्वयंसेवकांचा समावेश होता. ही लस प्रभावी ठरल्यानंतर कंपनीला यूके, युरोपियन युनियन आणि इतर देशांतही अर्ज करण्याची अपेक्षा आहे. सीरम इन्स्टिट्यूट याअगोदरचं ऑक्सफोर्ड विद्यापीठ आणि अ‍ॅस्ट्रॅजेनेकासोबत मोठ्या प्रमाणात लस तयार करत आहे. तर “अमेरिकन कंपनीचा प्रभावी डेटा मिळाल्यानंतर आम्ही ड्रग कंट्रोलर कार्यालयाकडे यापूर्वीच अर्ज केला आहे. त्यामुळे त्यांनीही आता लवकरच यास मान्यता द्यावी.” असेही पूनावाला म्हणालेत.

एका वृत्तसंस्थेला पूनावाला यांनी दिलेल्या माहितीनुसार, एप्रिल महिन्यापासून दरमहा नोव्हावॅक्स लसीचे ४० ते ५० दशलक्ष डोस तयार करण्याची क्षमता सीरम इन्स्टिट्यूटमध्ये आहे. युरोपियन युनियन, फिलिपिन्स, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड या अमेरिकन कंपनीकडून लस खरेदी करण्याची तयारी आधीच व्यक्त केली आहे. नोव्हावॅक्सच्या विकसित प्रथिने आधारित लस उमेदवाराचे नाव NVX-CoV2373 असून ही लस ब्रिटनमधील मानवी चाचण्यांच्या तिसऱ्या टप्प्यात नोव्हावॅक्सची विकसित लस ८९ टक्के परिणामी असल्याचे समोर आले आहे.

 

 

First Published on: January 30, 2021 5:57 PM
Exit mobile version