अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार

अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार

प्रातिनिधीक फोटो

तालुक्यात माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली आहे. शाळेच्या अध्यक्षानेच इयत्ता पहिली व दुसरीत शिकणार्‍या मुलींचे लैंगिक शोषण केले असल्याची तक्रार एका 7 वर्षीय मुलीच्या आईने केली आहे. या प्रकरणी लिंगपिसाट नारायण पाटील (40) याला पोलिसांनी अटक केली आहे. आणखी 8 ते 9 मुलींचा लैंगिक छळ या आरोपीने केला असल्याची शक्यता शाळेच्या मुख्याध्यापिकेनी बोलून दाखविली.

12 एप्रिल रोजी हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. एका मुलीने याबाबत शालेय पोषण आहार शिजविणार्‍या महिलेला घडलेला प्रकार सांगितला. याबाबतची कल्पना तिने तिच्या आईला दिल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. आणखी मुलींसोबत पाटील याने अश्लील चाळे केले असल्याचे शाळेच्या मुख्याध्यापिकेनी सांगितले. शाळेचे काम करण्याच्या निमित्ताने पाटील या मुलींना एका बंद शाळेच्या इमारतीत घेऊन जायचा आणि तिथे त्यांच्यासोबत अश्लील चाळे करायचा. 12 एप्रिलला देखील तो खड्डे खोदण्याच्या निमित्ताने या मुलींना बाहेर घेऊन गेला आणि त्यांच्याशी अश्लील चाळे केले. हा प्रकार शाळेत खाऊ शिजविणार्‍या महिलेच्या लक्षात आल्यानंतर तिने याची माहिती मुख्याध्यापिका आणि काही पालकांना दिली. त्यानंतर 15 एप्रिल रोजी येथील पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.

या आरोपी विरोधात भा. दं. वि. कलम 354, 506 आणि पोक्सो कलम 8 आणि 12 नुसार गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे. याबाबत पोलीस निरीक्षक अतुल अहेर अधिक तपास करत आहेत. आरोपी हा एका बड्या राजकीय पक्षाचा गाव अध्यक्ष आहे. या प्रकरणी राजकीय दबाव येऊ लागल्यानंतर संतप्त ग्रामस्थांनी पोलीस ठाण्यावर धडक दिली आणि आरोपीला कोणतेही राजकीय अभय देऊ नये अशी मागणी केली. दरम्यान, मंगळवारी हा प्रकार संपूर्ण तालुक्यात समजल्यानंतर याबाबत तीव्र प्रतिक्रीया उमटू लागल्या आहेत. अनेक महिला मंडळे, संघटनांनी या निंदनीय प्रकाराविरोधात सह्यांची मोहीम हाती घेतली आहे.

First Published on: April 17, 2019 4:15 AM
Exit mobile version