मुख्यमंत्र्यांच्या भेटीला थोरातांनंतर पवारही!

 मुख्यमंत्र्यांच्या भेटीला थोरातांनंतर पवारही!

राजस्थानमध्ये गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या नाट्यमय घडामोडी बघता. त्याचे पडसाद आता महाराष्ट्रातही उमटतील की काय? तसे प्रश्न उमटल्यास तोडगा काय काढाव्यात यासाठी जोर बैठका सुरू झाल्या आहेत. सोमवारी रात्री उशीरा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची बाळासाहेब ठाकरे स्मारकात जाऊन भेट घेतली. त्याचबरोबर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष व महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी देखील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतल्याने सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या आहेत.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडीच्या दोन प्रमुख नेत्यांशी संवाद साधला.  सर्वप्रथम काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी शिवाजी पार्क येथील बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारकात पोहचले. सुमारे तासभर ही भेट झाली. ही बैठक संपल्यानंतर पाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबरोबर बैठक पार पडली. पवार यांच्याशीही मुख्यमंत्र्यांनी दीर्घ चर्चा केली. यावेळी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदेही उपस्थित होते.

राजस्थानमधील घडामोडीनंतर महाराष्ट्र सरकार अलर्ट झालं आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काँग्रेसची नाराजी लक्षात घेत संवादावर भर देऊन त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. महाविकास आघाडीचं सरकार चालवत असताना तिन्ही पक्षांत सुसंवाद असायला हवा, अशी अपेक्षा गेल्या काही दिवसांपासून काँग्रेस आणि राष्ट्रवादीतून व्यक्त होत आहे. याअनुशंगाने बाळासाहेब थोरात आणि अशोक चव्हाण यांनी मातोश्री निवासस्थानी मुख्यमंत्र्यांची भेटही घेतली होती.

सध्या काय सुरू आहे राजस्थानमध्ये?

राजस्थानमधील सत्तासंघर्षाचा पेच अद्याप कायम असून अशोक गेहलोत सरकारवरील अस्थिरतेचे संकट अद्यापही कायम आहे. काँग्रेस विधीमंडळ पक्षाच्या सोमवारी झालेल्या बैठकीत मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी १०० हून अधिक आमदारांसह शक्तीप्रदर्शन केलं. राजस्थानमधील सत्तासंघर्षात वरिष्ठ नेत्यांनी मध्यस्थी केली आहे. मात्र, वरिष्ठ नेत्यांच्यानी केलेल्या मध्यस्थीने देखील सचिन पायलट यांनी बंडाचा पवित्रा कायम ठेवला आहे. सचिन पायलट यांच्या टीमने एक व्हिडीओ प्रसिद्ध केला आहे. यामध्ये १६ आमदार त्यांच्यासोबत बसले असल्याचं दिसत आहेत. सचिन पायलट यांनी याआधी आपल्याकडे ३० आमदारांचा पाठिंबा असल्याचं सांगितलं होतं. यामध्ये सचिन पायलट दिसत नाही आहेत. दरम्यान पायलट आणि गेहलोत यांच्यात समेट घडवण्याचे प्रयत्न सुरुच असून काँग्रेसच्या विधीमंडळ पक्षाची आज मंगळवारीदेखील बैठक होणार आहे. या बैठकीला सचिन पायलट जाणार नाही आहेत.


हे ही वाचा – सचिन पायलट भाजपच्या संपर्कात


 

First Published on: July 14, 2020 11:42 AM
Exit mobile version