लोकांच्या घोळक्यांवर शरद पवारांनी व्यक्त केली चिंता!

लोकांच्या घोळक्यांवर शरद पवारांनी व्यक्त केली चिंता!

रविवारी पुकारण्यात आलेल्या जनता कर्फ्यूनंतर सोमवारी सकाळपासूनच मुंबई-पुण्याच्या रस्त्यांवर मोठ्या संख्येनं नागरिक उतरल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. या नागरिकांनी अत्यंत गरज असेल, तरच घराबाहेर पडावं असं आवाहन देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केलं आहे. मात्र, तरीदेखील नागरिक रस्त्यावर उतरल्याचं चित्र मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळत आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी रस्त्यांवर दिसणाऱ्या लोकांच्या घोळक्यांवर चिंता व्यक्त केली आहे. ‘करोना व्हायरसची लढाई आपण जिंकणारच आहोत, परंतु गरज आहे संयम, समंजसपणा आणि योग्य ती दक्षता घेण्याची. मला विश्वास आहे तुम्ही याची गांभीर्याने दखल घ्याल’, असं आवाहन देखील शरद पवार यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून देशातील जनतेला केलं आहे.

‘परिस्थिती गांभीर्याने घेण्याची गरज’

कोरोनाचा वाढता प्रभाव लक्षात घेता राज्य आणि केंद्र सरकारने घेतलेल्या निर्णयाची गांभीर्याने नोंद घेऊन त्याची अंमलबजावणी करण्याची आवश्यकता आहे. राज्यात जमावबंदीचा निर्णय घेण्यात आला आहे. परंतु अजूनही अनेक शहरात आणि काही ठिकाणी लोकं रस्त्यावर घोळक्यांनी बघायला मिळत आहेत’, असं शरद पवार म्हणाले. ‘इतर देशात गंभीर स्थिती आहे. त्या स्थितीची गांभीर्याने नोंद घेऊन तिथल्या नागरिकांनी दक्षता घेतली आहे. आपल्याकडे करोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे आपणही ही परिस्थिती गांभीर्याने घेण्याची गरज आहे’, असंही शरद पवार यांनी सांगितलं.

मुलुंड टोल नाक्यावर वाहनांच्या रांगा

दरम्यान, ‘खूप गरज असेल तरच घराबाहेर पडा. नाहीतर घराबाहेर पडू नका. केंद्र आणि राज्य सरकारने जे आवाहन केले आहे त्याची गांभीर्याने नोंद घ्यावी आणि सरकारी यंत्रणेला पूर्णपणे सहकार्य करावे’, असं आवाहन शरद पवार यांनी केलं आहे.

First Published on: March 23, 2020 1:30 PM
Exit mobile version