महाराष्ट्र पिंजून काढत सरकारविरोधात रान पेटवणार, शरद पवारांची मोठी घोषणा

महाराष्ट्र पिंजून काढत सरकारविरोधात रान पेटवणार, शरद पवारांची मोठी घोषणा

राज्यात महाविकास आघाडी कोसळल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे अॅक्शन मोडवर आले आहेत. शरद पवार यांनी आज ठाण्यात पत्रकार परिषद घेत केंद्र आणि राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे. केंद्रातील भाजप सरकारने याआधी देशवासियांना दिलेली अनेक आश्वासने पूर्ण केली नाहीत. त्यामुळे राज्यातील काही जिल्ह्यांचा दौरा करून आढावा घेणार आहोत, असं शरद पवार म्हणाले.

ईडीसारख्या यंत्रणांचा वापर करून सत्ता मिळवण्याचा प्रयत्न सुरू

माणसं फोडणं, साधणांचा वापर करणं आणि ईडीसारख्या यंत्रणांचा वापर करून सत्ता मिळवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचं गंभीर चित्र या देशासमोर आज दिसत आहे. गुजरातमध्ये बिल्कीस बानो यांच्यावर अत्याचार झाला हे संपूर्ण देशाला माहित आहे. त्यामधे सेशन कोर्ट, उच्च न्यायालय, आणि सर्वोच्च न्यायालय यांनी कठोर शिक्षा दिली. आजन्म कारावास देण्यात आला होता. त्यानंतर ती जन्मठेपेत वर्ग केली. आता गुजरात सरकारने त्यांना सोडले आणि त्यांचा जाहीर सत्कार केला, असं पवार म्हणाले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे १५ ऑगस्टचे भाषण ऐकले, त्यामधे स्त्री वर्गाबाबत ते बोलले. मात्र, त्यांच्याच राज्यांत महिलांवर अत्याचार करणाऱ्या आरोपींना सोडण्यात आले. २०१४ मध्ये निवडणुकीला सामोरं जाताना सत्ताधाऱ्यांनी अच्छे दिनची घोषणा केली होती. किंमती कमी होतील बोलेले होते. त्यानंतर अच्छे दिन नागरिकांना जाणवले नाहीत, असं पवार म्हणाले.

ठाणे जिल्ह्यावर विशेष लक्ष देण्याची गरज

मी महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांचा दौरा करून आढावा घेणार आहे. ठाणे जिल्ह्यावर विशेष लक्ष देण्याची गरज आहे. आगामी निवडणुका महाविकास आघाडी म्हणून एकत्र लढावी, असं आमचं मत आहे, पण त्यावर निर्णय झालेला नाही. आम्ही एकत्र निवडणुकीला सामोरं जावं का याची चाचपणी करत आहोत, पण अजूनही निर्णय झालेला नाही, असं पवार म्हणाले.


हेही वाचा : एसी लोकल बंद केल्या पाहिजेत; रेल्वे प्रशासनाच्या निर्णयावर शरद पवार आक्रमक


 

First Published on: August 29, 2022 6:16 PM
Exit mobile version