गळाभेट घेऊन आणि शेक हॅण्ड करून प्रश्न सुटत नसतात, शरद पवार यांचा मोदींना टोला

गळाभेट घेऊन आणि शेक हॅण्ड करून प्रश्न सुटत नसतात, शरद पवार यांचा मोदींना टोला

गळाभेट घेऊन आणि शेक हॅण्ड करून प्रश्न सुटत नसतात

‘सारखे कपडे शिवून, झोपाळ्यावर बसणं, गळाभेट घेणं ठीक आहे, शेक हॅण्ड करणं ठिक आहे पण, त्याने प्रश्न सुटत नसतात, अशी टीका शरद पवार यांनी शी जिनपिंग भेटीवरुन मोदी सरकारवर केली. सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी घेतलेल्या मुलाखतीत शरद पवार यांनी भारत आणि चीन वादावर भाष्य केले. भारत आणि चीनमधील वादासंदर्भात राऊत यांनी प्रश्न विचारला असता पाकिस्तानपेक्षा भारतासाठी चीन अधिक धोकादायक असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. चीनची ताकद पाहता पाकिस्तानपेक्षा भारतासाठी चीनच अधिक अडचणी निर्माण करु शकतो’, असे पवार म्हणाले. ‘त्याचबरोबर दोन्ही देशांमध्ये सर्व काही व्यवस्थित सुरु आहे. हे दाखवण्यासाठी मोदी सरकारने चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांना भारत दौऱ्यावर बोलवून केलेल्या प्रयत्नांनी प्रश्न सुटणार नसल्याचे देखील ते म्हणालेत. तसेच
चीनसोबतचा प्रश्न भारताने चर्चेनेच सोडवायला हवा’, असे देखील पवार यावेळी म्हणालेत. एवढेच नाही तर सध्या हा प्रश्न लष्करी मार्गाने सोडवण्याची वेळ नसल्याचा सल्लाही त्यांनी मोदी सरकारला दिला आहे.

‘आपण लडाखमध्ये सैन्य नेत आहेत वगैरे पाहिलं मी. नरवणेंचं वक्तव्य पण पाहिलं मी. वेळ आली तर करु आपण करायचं आहे ते. त्याची काय किंमत द्यायचीय ती देऊ. पण, आज लष्करी शक्तीनं हा प्रश्न सोडवण्याची वेळ नाही हे लक्षात घ्यायचा हवं’, असं मत पवारांनी व्यक्त केलं. “मी चीन प्रश्नावर राजकारण आणू नका असं सांगतोय कारण प्रश्न गंभीर आहे. आपण लष्कर पाठवा असं सांगू शकतो. हल्ले करु शकतो. पण, त्याला जे उत्तर दिलं जाईल त्याची किंमत देशाला मोजावी लागेल. मात्र, वेळ आल्यावर तो ही निर्णय घेतला जाईल. सध्या तरी हल्ला करण्याऐवजी चर्चेच्या माध्यमातून प्रश्न सोडवावा,” असा सल्ला पवारांनी दिला आहे. मात्र चीनने आपल्या भागात घुसून जवानांवर हल्ला केला असेल तर भारताला निश्चित कडक भूमिका घ्यावी लागणार आहे. तसेच ही भूमिका वेळोवेळी घेतली पाहिजे, असं मत पवारांनी व्यक्त केलं. दरम्यान, चीनने भारताच्या सर्व शेजारी देशांना आपल्या बाजूने केलं असल्याचेही पवारांनी सांगितले. “चीनने काय केलं भारताच्या शेजारी सर्व देशांना आपल्या बाजूने केलं आहे. पाकिस्तान तर चीनच्या बाजूने आहेच. मात्र, ज्या बांगलादेशाची निर्मिती आपण केली तो बांगलादेश आणि हिंदू प्रदेश म्हणून ओळख असणारा नेपाळही चीनच्या बाजूने गेला. खाली श्रीलंकाही चीनच्या बाजूने आहे. एकंदरितच चहू बाजूने आपल्या शेजऱ्यांना चीनने आपल्या बाजूनं केलं आहे. त्या देशांकडून भारतविरोधी भूमिका ऐकायला मिळते. हे अलीकडच्या काळातले योगदान असल्याचा टोला पवारांनी लगावला आहे.

दरम्यान भारताचं परराष्ट्र धोरण चुकत आहे का असा प्रश्न राऊत यांनी विचारला असता पवारांनी नाही, असे उत्तर देत नेहरु, इंदिरा गांधी आणि अटलबिहारी वाजपेयी यांच्या कालावधीमध्ये परराष्ट्रधोरणात काही बदल झाला नाही, असे देखील ते म्हणालेत. १९९३ साली मी संरक्षणमंत्री म्हणून चीनला गेलो तेव्हा आम्ही चीनशी एक करार केला. त्या कराराचा मसूदा असा होता की लडाख आणि परिसरात दोन्ही देशांमध्ये संघर्ष नको. एखाद्या दुसऱ्या गोष्टीवर वाद झालाच तर तेव्हा बंदूका वापरायच्या नाहीत असे ठरले होते. म्हणूनच लडाखमध्ये झालेल्या संघर्षामध्ये फायरिंग झाली नाही,” असं पवार म्हणाले.


हेही वाचा – सहामाहीत मुख्यमंत्र्यांसह सर्व विदयार्थी पास – शरद पवार


 

First Published on: July 12, 2020 10:39 AM
Exit mobile version