शरद पवारांचा गंभीर आरोप; म्हणाले, “भाजपमध्ये प्रवेश करणाऱ्यांचे…”

शरद पवारांचा गंभीर आरोप; म्हणाले, “भाजपमध्ये प्रवेश करणाऱ्यांचे…”

राज्यात शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झाल्यानंतर दोन्ही गटामध्ये जोरदार इन्कमिंग सुरू आहे. तर दुसरीकडे निवडणुकांच्या तोंडावर महाविकास आघाडीतील नेत्यांना भाजपमध्ये आणण्याची चढाओढच सुरु झाल्याचं दिसत आहे. तसंच विरोधकांना खोट्या गुन्ह्यांमध्ये अडकवण्यासाठी भाजप कटकारस्थान करत असल्याचा आरोपही गेल्या काही दिवसात मोठ्या प्रमाणात होऊ लागला आहे. यावर आता राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी लक्ष घातलंय. त्यानंतर शरद पवार यांनी भाजपवर आणखी एक गंभीर आरोप केलाय.

विरोधी पक्षातील नेत्यांवर केंद्रीय यंत्रणांच्या वाढत्या कारवायांनंतर प्रादेशिक पक्षाच्या 9 नेत्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिले आहेत. तसेच या पत्रात विरोधी पक्षातील नेत्यांनी काही गंभीर आरोप केले आहे. यात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार, ठाकरे गटाचे प्रमुख, उद्धव ठाकरे, तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव,पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, सपा नेते अखिलेश यादव, बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव, जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला, पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान या नेत्यांचा समावेश आहे.
शरद पवार सध्या कराड दौऱ्यावर आहेत. यावेळी माध्यमांशी संवाद साधताना शरद पवार यांनी भाजपवर आणखी एक मोठा आरोप केलाय, भाजपमध्ये प्रवेश करणाऱ्यांवरील गुन्हे मागे घेतले जात असल्याचा घणाघाती आरोप यावेळी शरद पवारांनी केलाय. यावेळी बोलताना शरद पवार म्हणाले की, “विरोधी पक्षातील जे नेते भाजपमध्ये प्रवेश करतात, त्यानंतर त्यांच्यावरील सुरू असलेल्या खटल्यांचा तपास आपोआप थंडावतो.” केंद्रीय यंत्रणांनी अलीकडे सिसोदियांवर कारवाई केली. राज्यपालांकडून मुख्यमंत्र्याच्या कामात हस्तक्षेप होत असल्याचं देखील यावेळी शरद पवार म्हणाले.

ठाकरे गटाचे खासदार आणि प्रमुख प्रवक्ते संजय राऊत यांच्या हक्कभंगाची समितीवरही शरद पवारांनी वक्तव्य केलंय. “समिती नेमायची की नाही याबाबत विधानसभेला अधिकार आहे. पण समिती नेमण्याची मागणी करणारे जे लोक आहेत त्यांची नियुक्ती समितीचा निर्णय घेण्यासाठी करण्यात आली. याचा अर्थ असा आहे की, एखाद्याने दुसऱ्याच्या संदर्भात तक्रार केली, त्यांनाच त्या तक्रारीचा निर्णय घेण्यासाठी न्यायाधीश बनवलं तर निर्णय काय येईल? असा प्रश्न आहे.” असं देखील यावेळी शरद पवार म्हणाले.

तसंच आगामी काळात होणाऱ्या निवडणूकींमध्ये राष्ट्रवादी ठाकरे गटासोबत जाणार का? असा प्रश्न केला असताना शरद पवारांनी सूचक वक्तव्य केलंय. “आगामी निवडणूकांमध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेस, कॉंग्रेस आणि उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालील शिवसेना एकत्र यावी, अशी विचारधारणा आहे. यावर सध्या चर्चा सुरू आहे. मात्र अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही.” असं देखील शरद पवारांनी सांगितलं.

First Published on: March 5, 2023 2:24 PM
Exit mobile version