शरद पवार आज, उद्या कोकण दौर्‍यावर

शरद पवार आज, उद्या कोकण दौर्‍यावर

‘निसर्ग’ चक्रीवादळाने कोकणाचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले असून या नुकसानीच्या पाहणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार हे दोन दिवस कोकण दौरा करणार आहेत. ९ जून रोजी रायगड आणि १० जूनला रत्नागिरी जिल्ह्यातील नुकसानग्रस्त भागाची पाहणी करून शेतकर्‍यांच्या भेटी घेऊन संपूर्ण माहिती ते जाणून घेणार आहेत.

दरम्यान ९ जून रोजी सकाळी ८.३० वाजता मुंबईतून ते गाडीने जाणार असून, सकाळी ११.३० वाजता माणगाव, १२.३० वाजता म्हसळा, १ वाजता दिवेआगार, २ वाजता श्रीवर्धन, ४ वाजता श्रीवर्धन येथे आमदार, खासदार आणि अधिकारी यांच्यासोबत बैठक, सायंकाळी ५ वाजता हरिहरेश्वर आणि नंतर ६ वाजता बागमांडला मार्गे दापोलीकडे रवाना होणार आहेत.

दापोली येथे ते मुक्काम करणार आहेत. दरम्यान यावेळी राष्ट्रवादीचे नेते खासदार सुनिल तटकरे, रायगडच्या पालकमंत्री आणि विधी व न्याय राज्यमंत्री आदिती तटकरे व स्थानिक आमदार उपस्थित राहणार आहेत. १० जून रोजी रत्नागिरी जिल्हा दौरा असून, सुरुवातीला दापोली येथील नुकसानीची पाहणी करणार आहेत.

दरम्यान राज्य सरकारने रायगड जिल्ह्याला 100 कोटी आणि रत्नागिरी-सिंधुदुर्ग जिल्ह्याला 100 कोटी तातडीची मदत जाहीर केली आहे. मात्र आता शरद पवार यांच्या दौर्‍यानंतर कोकणवासीयांच्या पदरात आणखी काही मदत मिळते का हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

First Published on: June 9, 2020 7:10 AM
Exit mobile version