अर्धवट कामाच्या उद्घाटनासाठी मोदी येत आहेत

अर्धवट कामाच्या उद्घाटनासाठी मोदी येत आहेत

मेट्रोच्या उद्घाटनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी रविवारी (६ मार्च) पुण्यात येत आहेत. या दौर्‍यावर राष्ट्रवादी काँगेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी टीका केली आहे. मला मेट्रो दाखवली आहे. माझ्या लक्षात आले की सगळे काम काही झालेले नाही. मग अजूनही मेट्रोचे काम पूर्ण झालेले नाही त्या अर्धवट कामाचे उद्घाटन होत आहे, असा टोला शरद पवार यांनी लगावला आहे.

पंतप्रधान मोदी रविवारी पुणे दौर्‍यात कर्वे रस्त्यावरील गरवारे महाविद्यालय येथे पुणे मेट्रो मार्गिकेचे उद्घाटन करणार आहेत. तसेच ते मेट्रोने आनंदनगरपर्यंतचा प्रवास करणार आहेत. याशिवाय संगमवाडी ते बंडगार्डन या नदी काठ सुधार प्रकल्पाचे भूमिपूजन, पंतप्रधान आवाज योजनेतील १ हजार घरांची लॉटरी, पीएमपीच्या ७० ई-बसेसचे लोकार्पण, आर. के. लक्ष्मण आर्ट गॅलरीचे आणि महापालिकेतील छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाचे उद्घाटनही पंतप्रधान मोदी करणार आहेत.

पंतप्रधानांच्या या दौर्‍याबाबत पुणे येथे पत्रकारांशी बोलताना शरद पवार म्हणाले की, पुण्यात अनेक उद्घाटनांचे कार्यक्रमही होत आहेत. त्याबद्दल काही तक्रार नाही. पण मेट्रोचे अजून कामच पूर्ण झालेले नाही. हा प्रकल्प सुरू व्हायला अजून अनेक दिवस लागतील. पण त्या कामाचे उद्घाटन होत आहे.या महत्त्वाच्या कार्यक्रमासोबतच युक्रेनमधील मुलांची सोडवणूक करणेही अधिक महत्त्वाचे आहे. असे सांगतानाच देशाची सूत्रे ज्यांच्याकडे आहेत, ते याची गांभीर्याने दखल घेतात का? हा महत्वाचा सवाल आहे. आज रशिया व युक्रेन युद्धाच्या संकटात कुणी काय केले किंवा काय केले नाही. याची चर्चा करण्याची ही वेळ नाही. या मुलांना संकटातून कसे वाचवता येईल याकडे सत्ताधारी घटकांनी अधिक लक्ष द्यायला हवे.

युक्रेनमधून भारतीय विद्यार्थ्यांना पुन्हा देशात आणण्यासाठी भारत सरकार आणि दुतावासाने काही प्रयत्न केले आहेत. पण काल माझ्याशी रशियाच्या सीमेपासून पाच तासांवर असलेल्या विद्यार्थ्यांनी फोनवरुन संवाद साधला. त्यानंतर परराष्ट्र मंत्र्यांशीही माझे बोलणे झाले, असेही शरद पवार यांनी सांगितले.

केंद्र सरकार या मुलांना परत आणण्यासाठी जे जे करता येईल, ते करण्याचा प्रयत्न करत आहे. तरीही अजून विद्यार्थी तेथे आहेत. विद्यार्थ्यांनी लवकरात लवकर युक्रेनच्या सीमेबाहेर येता येईल असा प्रयत्न करा, असे भारतीय दुतावासाकडून त्यांना सांगितले जात आहे. मात्र मुलांचे म्हणणे आहे की, युक्रेनच्या सीमेवर जाण्यासाठी पाच ते सहा तास चालावे लागेल. त्यात भयंकर थंडी आहे, तर दुसरे म्हणजे तिथे हल्ले होत आहेत, गोळीबार होत आहे. त्यामुळे विद्यार्थी अकडले आहेत, असेही शरद पवार यांनी सांगितले.

First Published on: March 6, 2022 4:53 AM
Exit mobile version