नाठाळ बैलांना बाजार दाखवा; पक्ष सोडलेल्या नेत्यांवर पवारांची टीका

नाठाळ बैलांना बाजार दाखवा; पक्ष सोडलेल्या नेत्यांवर पवारांची टीका

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची जालना येथे सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेत त्यांनी पक्ष सोडून गेलेल्या नेत्यांवर टीकास्त्र सोडले. ‘काही जण आज पक्ष सोडून जात आहेत. मराठवाड्यातील काही नेते देखील सोडून गेलेत. ते म्हणतात, आम्हाला विकास करायचा आहे. अरे तुम्हाला इतकी वर्षे सत्ता दिली तेव्हा काय केले? या जनतेने तुम्हाला मोठे केले, पक्षाने हवं ते दिले. त्या व्यासपीठाशी गद्दारी करता? एकदा काय उन्हाळा आला तर पळापळी सुरू केली. या साऱ्यांचा विकास आपण मिळून करू. जास्त दिवस राहिले नाही. मतपेटीत आपले मत टाकून आपण यांना उत्तर देऊ’, असे शरद पवार म्हणाले. यापुढे शरद पवार म्हणाले की, ‘बैलजोडीत काही बैलं नाठाळ असतात. नांगरणी करताना काही बैलं वाकडे चालतात. मग आपण त्यांची जागा अदलबदल करतो तरी तो नाठाळ बैल तसा वागला तर त्याला आठवड्याचा बाजार दाखवतो. आज काही बैल तसेच झाले आहे. मतदानाच्या दिवशी यांना बाजार दाखवा’.


हेही वाचा – शिवसेना-भाजप युती होणारच – उद्धव ठाकरे


 

शरद पवार यांचा राज्यव्यापी दौरा

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील अनेक दिग्गज नेत्यांनी पक्षाला सोडचिठ्ठी देऊन सत्ताधारी भाजप आणि शिवसेना पक्षात प्रवेश केला. त्यामुळे राष्ट्रवादी पक्षावर मोठे संकट ओढावले. या कठीण परिस्थितीत पक्षाच्या कार्यकर्त्यांमधील उत्साह वाढवण्यासाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी राज्यव्यापी दौरा सुरु केला आहे. हा दौरा मंगळवारपासून सुरु झाला. या दौऱ्याला राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून जोरादार प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे शरद पवार यांच्या सभेला तरुणांची मोठी गर्दी पाहायला मिळतोय. दरम्यान, शुक्रवारी शरद पवार यांची जालना येथे सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेत त्यांनी पक्ष सोडून गेलेल्या नेत्यांवर टीकास्त्र सोडले.

शरद पवार यांची सरकारवर टीका

‘आज ज्यांच्या हातात सत्ता आहे त्यांचे निर्णय आणि धोरणं चुकली आहेत. त्यामुळे संपूर्ण राज्याला त्याचा फटका बसत आहे. राज्य मोठ्या संकटात आहे, असं असताना यांना झोप तरी कशी लागते? राज्यासमोर शेतकरी आत्महत्या हा एक मोठा प्रश्न आहे. राज्यात १६ हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे. त्यांच्या डोक्यावर मोठे कर्ज आहे. शेतमालाला भाव नाही, त्यामुळे तो आत्महत्या करतोय. मात्र, सरकार याची दखल घेत नाही’, असे शरद पवार म्हणाले. त्याचबरोबर ‘कोल्हापूर, सांगली, सातारा येथे महापूर आला. लोकांचे मोठे नुकसान झाले. सोन्यासारखी पिके बरबाद झाली. मुख्यमंत्र्यांनी त्याकडे ढुंकूनही पाहिले नाही. मुख्यमंत्र्यांनी फक्त हवाई पाहणी केली. लेका त्यांचा संसार उद्ध्वस्त झाला तू हवाई दौरा कसला करतोय?’, असा जोरदार टोलाही शरद पवार यांनी लगावला.


हेही वाचा – भाजप सोडून विजय घोटमारे यांचा राष्ट्रवादीत प्रवेश


 

याशिवाय ‘राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता असताना शेतकऱ्यांचा नेहमीच विचार केला गेला आणि त्या दृष्टोकोनाने पाऊल उचलले गेले’, असे शरद पवार म्हणाले. याबाबत त्यांनी जालन्यातील दुष्काळ परिस्थितीचे उदाहरण दिले. ‘जालन्यात दुष्काळ पडला होता. मोसंबीचे नुकसान झाले होते. तात्काळ या भागाला निधी दिला. पिकवणारा जगला तर खाणारा जगेल म्हणून आम्ही ती भूमिका घेतली. आजचे राज्यकर्ते तशी भूमिका घेताना दिसत नाही. मग अशा राज्यकर्त्यांना बदलण्याची गरज आहे ना?’, असे शरद पवार म्हणाले.

First Published on: September 20, 2019 5:23 PM
Exit mobile version