अनिल देशमुख प्रकरणावरुन शरद पवार राष्ट्रवादीच्या नेत्यांवर नाराज

अनिल देशमुख प्रकरणावरुन शरद पवार राष्ट्रवादीच्या नेत्यांवर नाराज

राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या सिल्वर ओकवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची बैठक पार पडली. आज झालेल्या बैठकीत शरद पवार अनिल देशमुख प्रकरणावरुन राष्ट्रवादीच्या नेत्यांवर नाराज असल्याचं समजतंय. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी अनिल देशमुख यांच्यावर केलेल्या आरोपांची सीबीआय चौकशीच्या उच्च न्यायालयाच्या आदेशाविरोधात सर्वोच्च न्यायालयात राज्य सरकार आणि अनिल देशमुख यांनी यांचिका दाखल केली होती. ती याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली. या पार्श्वभूमीवर आज राष्ट्रवादीची बैठक होती.

माध्यमांमध्ये अनिल देशमुख यांची बाजू मांडण्यात पक्ष कमी पडला म्हणून शरद पवार नाराज आहेत. तसंच या बैठकीत राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले नसल्याने शरद पवारांनी नाराजी व्यक्त केली. मात्र, अनिल देशमुख ज्यावेळेस सीबीआय चौकशीला सामोरे जातील तेव्हा पक्ष पाठीशी असेल, असं पवारांनी बैठकीत स्पष्ट केलं आहे. या बैठकीला जलसंपदा मंत्री जयंत पाटील, गृहमंत्री वळसे पाटील, गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड, राष्ट्रवादीचे नेते प्रफुल पटेल, माजी गृहमंत्री अनिल देशमुख हे देखील उपस्थितीत होते.

अनिल देशमुख आणि राज्य सरकारला दणका

परमबीर सिंग लेटरबॉम्ब प्रकरणात सीबीआय चौकशी च्या उच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधात अनिल देशमुख यांना सर्वोच्च न्यायालयाने दणका दिला. यासोबत न्यायालयाने महाविकासआघाडी सरकारने केलेली याचिकाही फेटाळून लावली. याप्रकरणात आपली बाजू ऐकूनच घेतली नाही. त्यामुळे सीबीआयकडून होऊ घातलेली आपली चौकशी रोखावी, अशी मागणी अनिल देशमुख यांनी केली होती. मात्र, याप्रकरणात सीबीआय चौकशीचा निर्णय योग्य असल्याचे सांगत सर्वोच्च न्यायालयाने मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय उचलून धरला. त्यामुळे आता अनिल देशमुख यांना सीबीआयच्या चौकशीला सामोरे जाण्याशिवाय गत्यंतर उरलेलं नाही.

 

First Published on: April 9, 2021 10:22 PM
Exit mobile version