पुढच्या स्वातंत्र्यदिनी आपल्या मनातल्या माणसाचं भाषण होणार – जयंत पाटील

पुढच्या स्वातंत्र्यदिनी आपल्या मनातल्या माणसाचं भाषण होणार – जयंत पाटील

जयंत पाटिल,छगन भुजबळ नवाब मलिक

भारतीय स्वातंत्र्यदिनानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश कार्यालयात आयोजित कार्यक्रमात आज जयंत पाटिल यांनी पक्षातील कार्यकर्त्यांचा उत्साह बघून पुढच्या स्वातंत्र्यदिनादिवशी लालकिल्ल्यावरुन होणारे भाषण तुमच्या-माझ्या मनातल्या माणसंच होईल, असे प्रतिपादन केले. देशाचे पुढचे पंतप्रधान तुमच्या माझ्या (जयंत पाटिल आणि कार्यकर्त्यांच्या) मनातले असतील असं म्हणत त्यांनी शरद पवारांकडे इशारा केला. पाटिल म्हणाले की, भारताची आर्थिक,सामाजिक क्षेत्रात प्रगती करण्याची भूमिका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आहे. शरद पवारांच्या नेतृत्वाखाली आपण ज्या उद्देशाने पक्षाची स्थापना करुन देशाची आणि राज्याची प्रगती करण्याचा प्रयत्न केलेला, त्याचं पुढचं पाऊल टाकण्याची ताकद स्वातंत्र्यदिनाच्यादिवशी सर्वांना मिळो, अशी इच्छादेखील व्यक्त केली.

पाटिल म्हणाले की, गेल्या चार वर्षाच्या कालखंडात देशाच्या प्रगतीविषयी लोकांच्या मनात शंका निर्माण होवू लागली आहे. सकाळी वर्तमानपत्रात पाहिल्यानंतर धक्के बसतात. देशातील एखाद्या बॅंकेतील पैसेच आपोआपच दुसऱ्या बॅंकेत जातात. या देशातील सर्व निवडणूका एका दिवसात घेण्याचा प्रयत्न सुरु आहेत. रुपयादेखील ७० रुपयाच्या वर जायला लागतो. हे सर्व धक्कादायक आहे. साडेतीन वर्षात या देशातील जनतेने विश्वासाने सध्याच्या सरकारच्या हातात हात दिला त्याबद्दल आज प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

भुजबळ पहिल्यांदाच प्रदेश कार्यालयात

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आमदार छगन भुजबळ प्रथमच स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमाला प्रदेश कार्यालयात उपस्थित होते. पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक, कोषाध्यक्ष आमदार हेमंत टकले, प्रदेश सरचिटणीस शिवाजीराव गर्जे, आमदार विद्या चव्हाण, मुंबई अध्यक्ष सचिन अहिर आणि कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.

काँग्रेस म्हणतं पुढचा पंतप्रधान आमचा

दरम्यान मुंबईत काँग्रेसच्या टिळक भवन कार्यालयात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्षअशोक चव्हाणांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले होते. यावेळी अशोक चव्हाण म्हणाले की, लाल किल्ल्यावरुन हे मोदींचे शेवटचे भाषण असेल. पुढचा पंतप्रधान आमचाच असेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. देशात १५ हजारापेक्षा जास्त शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. त्यावर मोदी काहीही बोलत नाहीत. मीरा भाईंदरमध्ये बॉम्ब सापडूनही पुढे कारवाई का होत नाही? सनातन संस्थेवर बंदी का घातली जात नाही?.कोर्टात खटले का व्यवस्थित चालत नाहीत? असे अनेक सवाल अशोक चव्हाण यांनी उपस्थित केले.

First Published on: August 15, 2018 3:59 PM
Exit mobile version