ईडी, सीबीआयद्वारे सूड उगवण्याचा नवा पॅटर्न – शरद पवारांची टीका

ईडी, सीबीआयद्वारे सूड उगवण्याचा नवा पॅटर्न – शरद पवारांची टीका

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या निवासस्थानी ईडीकडून छापेमारी करण्यात आल्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका केली. ‘हे काही नवीन नाही. अनिल देशमुखांच्या आधीही अनेकांबाबत केंद्रीय तपास यंत्रणेचा गैरवापर झाला आहे. त्याची आम्हाला चिंता वाटत नाही. तसेच त्याला महत्व देण्याचीही गरज नाही. यापूर्वीही देशमुख यांच्या घरावर छापेमारी करत त्यांच्या कुटुंबियांना त्रास देण्यात आला; पण त्यात काही हाती लागले नाही.

आताही काही लागणार नाही. त्यामुळे त्याबाबत आम्हाला कसलीच चिंता वाटत नाही. ईडी आणि सीबीआयद्वारे या देशात सूड उगवण्याचा नवा पॅटर्न या देशात आला आहे’, अशा शब्दात शरद पवार यांनी टीकास्त्र सोडले.‘जो विचार आपल्याला मान्य नाही, तो विचार दडपण्याचा प्रयत्न ईडीसारख्या यंत्रणांकडून होत आहे. हे अनेक राज्यात होत असून केंद्रातील सत्ता भाजपच्या हातात आल्यानंतर हे घडत आहेत. लोक सुद्धा त्यांची गांभीर्याने नोंद घेत नाहीत, याकडे पवार यांनी लक्ष वेधले. टाटांना खोल्या देण्याचा प्रश्न मिटला.

टाटा रुग्णालयाला म्हाडाच्या सदनिका देण्याबाबत दोन दिवसांपूर्वी झालेल्या घडामोडींवरही पवारांनी भाष्य केले. त्याबाबत पर्यायी व्यवस्था झाली आहे. आता त्याची काही अडचण नाही. टाटा हॉस्पिटल देशातील एक नंबरचे कॅन्सर रुग्णालय असून तिथे राज्यासह देशाच्या कानाकोपर्‍यातून नागरिक येतात. जितेंद्र आव्हाडांना तिथल्या डॉक्टरांनी नातेवाईकांच्या राहण्याबाबत प्रश्न मांडला होता.स्थानिक आमदारांनी तक्रार केल्याने मुख्यमंत्र्यांनी स्थगिती दिली; पण नंतर लगेचच दुसरीकडे जागा दिली, त्यामुळे प्रश्न सुटला असल्याचे पवार म्हणाले.

First Published on: June 26, 2021 4:21 AM
Exit mobile version