सांगलीत या…सोन्याच्या वस्तऱ्याने दाढी करा!

सांगलीत या…सोन्याच्या वस्तऱ्याने दाढी करा!

सोन्याचा वस्तरा

व्यवसाय म्हटला की त्यातील स्पर्धा कापण्यासाठी आणि वेगळेपण जपण्याची धडपड आपसूकच आली. आपल्या व्यवसायाबाबत अनेकजण काही बाबतीत ठाम असतात. आपला व्यवसाय वाढविण्यासाठी ते अनोखी शक्कल लढवत असतात. सांगलीतील एका मेन्स पार्लरवाल्याने आपल्या पार्लरमध्ये ग्राहकांची दाढी करण्यासाठी खास सोन्याचा वस्तरा बनवून घेतला आहे. या कलंदराचे नाव आहे रामचंद्र काशीद. आपला व्यवसाय ज्या साधनामुळे चालतो ते व्यावसायिकाला विशेष प्रिय असते. काशीद यांनी तब्बल साडेदहा तोळ्याचा वस्तरा तयार करुन घेतला आहे. या वस्तऱ्याने दाढी करण्यासाठी त्यांच्याकडे रांगा लागतील, असे त्यांना वाटते.

१८ कॅरेट सोन्याचा हा वस्तरा तीन लाख रुपयांना घेतला असून काशीद यांनी या वस्तऱ्याने पहिल्यांदा आपल्या वडिलांची दाढी केली. याचे निमित्तही अनोखे होते. आई-वडिलांच्या लग्नाच्या ३३ व्या वाढदिवसाचे औचित्य साधत त्यांनी ‘गोल्डन शेव’ केली. आता हा अनोखा सोन्याचा वस्तरा नेमका तयार कोणी केला? असा प्रश्न तुम्हाला सहाजिकच पडला असेल. काशीद यांनी हा वस्तरा कोण बनवून देणार यासाठी खूप शोधाशोध केली, मात्र कोणीच तयार झाले नाही. अखेर सांगलीतील चंदूकाका सराफमधील मॅनेजर महावीर पाटील यांनी हे आव्हान स्वीकारले. पुण्यातील मिथुन राणा या कारागिराच्या मदतीने मोठ्या मेहनतीने २० दिवसांत काशीद यांना हवा असलेला वस्तरा तयार झाला. आता या वस्तऱ्याने दाढी करायचे दर काशीद यांनी अजून जाहीर केले नाहीत. मात्र, किमान एकदा तरी या वस्तऱ्याने दाढी करायची इच्छा सांगलीतील पुरुषांची असेल हे नक्की.

First Published on: May 17, 2018 11:12 AM
Exit mobile version