शिंदे गट-भाजपात श्रेयवाद; खासदार-आमदार आमनेसामने

शिंदे गट-भाजपात श्रेयवाद; खासदार-आमदार आमनेसामने

नाशिक : पालकमंत्री दादा भुसे यांनी महापालिकेत घेतलेल्या बैठकींनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे शहरातील प्रश्न सोडवण्यासाठी शुक्रवारी (दि. ४) बैैठकीचे नियोजन करण्यात आले होते. या बैठकीसंदर्भात खासदार हेमंत गोडसे यांनी प्रेसनोट काढल्यानंतर त्यावर पश्चिम मतदार संघाच्या आमदार सीमा हिरे यांनी आक्षेप घेत आपल्या पाठपुराव्यामुळेच ही बैठक घेतली जात असल्याचा दावा केला आहे. त्यामुळे शिंदे गट आणि भाजपात आता दरी वाढत चालल्याचे चित्र दिसत आहे. दरम्यान, मुख्यमंत्र्यांनी शुक्रवारच्या सर्वच बैठका रद्द केल्याने नाशिक संदर्भातील बैठकही होऊ शकली नाही.

नाशिक महापालिकेत पालकमंत्री दादा भुसे यांच्या प्रमुख उपस्थितीत नवरात्रीच्या काळात शहरातील विविध प्रश्नांसंदर्भात बैठक घेण्यात आली होती. मात्र या बैठकीस भाजपचे आमदार आणि पदाधिकार्‍यांना निमंत्रित न केल्यामुळे भाजपच्या गोटातून नाराजी व्यक्त करण्यात आली होती. त्यानंतर गेल्या गुरुवारी पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत महापालिकेत पुन्हा आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीला भाजपच्या आमदारांना आवर्जून निमंत्रीत करण्यात आले होते. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे नाशिक महापालिकेशी संबधित विविध प्रश्नासंदर्भात आयोजित बैठकीची माहिती देणारी प्रेसनोट खासदार हेमंत गोडसे यांनी काढली. परंतु यासंदर्भात भाजपच्या आमदारांना माहिती देण्यात आली नाही. मात्र संबधित बैठक आपल्याच मागण्यासंदर्भात बोलवल्याचा दावा भाजप आमदार सीमा हिरे यांनी केला.

अशा अनेक बैठका होत असतात मात्र, त्याबाबत ठोस निष्पन्न झाल्यनंतरच आम्ही माहिती देत असतो असे सांगत त्यांनी बैठकांचे श्रेय लाटणार्‍यांना टोला लगावला. शहरातील मिळकतींना रेडीरेकनरनुसार भाडे आकारणी केली असून सामाजीक संस्थांना हे दर परवडत नाही. समाज मंदिर, अभ्यासीका तसेच खोका मार्कट व व्यापारी संकुलातील गाळेही चालवणे अवघड झाले आहे. पेलीकन पार्क, सिडकोतील 28 हजार घरे फ्री होल्ड करणे अशा विविध मागण्यांसाठी आपणच बैठक बोलवली होती. मात्र, अचानक ही बैठक तेव्हा रद्द झाल्याचाही दावा केला आहे. हिरे यांच्या दाव्यामुळे बैठकीवरून सुरू झालेला श्रेयवाद चर्चत आला आहे.

First Published on: November 5, 2022 12:36 PM
Exit mobile version