गुरुवारचा मुहूर्त : डीजीसीएने साईभक्तांना दिली ‘ही’ भेट…

गुरुवारचा मुहूर्त : डीजीसीएने साईभक्तांना दिली ‘ही’ भेट…

 

मुंबईः शिर्डी विमानतळावर नाईट लॅंडींगला केंद्र सरकारने गुरुवारी परवानगी दिली. त्यामुळे साईभक्तांना रात्रीही शिर्डीला जाण्याचे नियोजन करता येणार आहे. समृद्धी महामार्ग, वंदे भारत ट्रेन यानंतर आता साईभक्तांना नाईट लॅंडींगची भेट मिळाली आहे. गुरुवारी साईबाबांची खास आरती केली जाते. या दिवशी डीजीसीएने ही परवानगी दिल्याने साईभक्तांचा आनंद द्विगुणीत झाला आहे. ही सेवा मार्च/ एप्रिलमध्ये सुरु होईल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

शिर्डी विमानतळावर नाईट लॅंडींगला परवागनी द्यावी, अशी मागणी गेले अनेक दिवस होत होती. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागरी उड्डाण मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांच्याकडे या मागणीचा पाठपुरावा केला. अखेर त्यांच्या प्रयत्नांना यश आले. गुरुवारी डीजीसीएने नाईट लॅंडींगचा परवाना जारी केला. त्यामुळे उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि नागरी उड्डयण मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांचे आभार मानले आहेत. विशेष म्हणजे देवेंद्र फडणवीस यांच्या काळात, २०१७ मध्ये शिर्डी विमानतळ सुरु झाले. सध्या शिर्डीला १३ विमानसेवा सुरु आहेत.

शिर्डीला भाविकांचा ओघ दिवसरात्र सुरुच असतो. साईबाबांच्या दानपेटीत भक्त मुक्तहस्ते दान करत असतात. नवीन वर्षाच्या स्वागताला शिर्डीला भरघोस दान मिळाले. शिर्डीतील साईबाबांच्या दानपेटीत नवीन वर्ष व नाताळ निमित्त १७.८१ कोटी रुपयांची देणगी जमा झाली. शिर्डी महोत्‍सवाच्‍या २५ डिसेंबर २०२२ ते ०२ जानेवारी २०२३ या कालावधीत सुमारे ०८ लाख साईभक्‍तांनी साईबाबांच्‍या समाधीचे दर्शन घेतले, तर या कालावधीत सुमारे १७.८१ कोटी रुपये देणगी प्राप्‍त झाली.

गेल्या वर्षभरात साई बाबांच्या भक्तांनी देवस्थानाला ३९४ कोटी २८ लाख ३६ हजार रुपयांची देणगी दिली. १ जानेवारी ते २६ डिसेंबर २०२२ या कालावधीत ही देणगी प्राप्त झाली आहे. दक्षिणा पेटीच्या माध्यमातून १६६ कोटी, देणगीसाठी उभारलेल्या काऊंटरच्या माध्यमातून ६६ कोटी अशी रोख रक्कम तर २५ किलो सोने आणि ३२६ ग्राम चांदी अशी वस्तूंच्या स्वरुपात ही देणगी शिर्डी संस्थानला प्राप्त झाली आहे.

 

First Published on: February 16, 2023 5:28 PM
Exit mobile version