लोकसभा पोटनिवडणूक शिवसेना स्वबळावर लढणार, भाजपाची कोंडी?

लोकसभा पोटनिवडणूक शिवसेना स्वबळावर लढणार, भाजपाची कोंडी?

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे

आगामी लोकसभा पोटनिवडणूक स्वबळावर लढण्याचा निर्णय शिवसेनेने घेतला आहे. पालघर व भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघ आणि सांगली जिल्ह्यातील पळुस-कडेगाव विधानसभा मतदारसंघाच्या रिक्त जागांवर ही पोटनिवडणूक होईल. शिवसेनेने स्वबळाचा नारा देत लोकसभा मतदारसंघात भाजपला धोबीपछाड देण्यासाठी रणनीती आखली आहे. निवडणूक आयोगाने जाहीर केल्याप्रमाणे २८ मे रोजी मतदान आणि ३१ मे रोजी मतमोजणी होणार आहे.

शिवसेना उमेदवार देणार नाही

पळुस-कडेगाव मतदार संघाचे काँग्रेसचे आमदार पतंगराव कदम यांचे निधन झाल्याने रिक्त झालेल्या एका जागेसाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे उमेदवार देणार नसल्याचे सांगितले जात आहे. पतंगराव कदम आणि ठाकरे कुटुंबाचे संबध चांगले असल्याने शिवसेना उमेदवार देणार नसल्याचे निश्चित झाले आहे.

भाजपाची होणार कोंडी?

शिवसेनेने राज्याच्या राजकारणात पोटनिवडणुका लढल्या नव्हत्या. गोपीनाथ मुंडे यांच्या मृत्यूने रिक्त झालेल्या पोटनिवडणुकीत शिवसेनेने लोकसभा आणि विधानसभा पोटनिवडणूक लढली नव्हती. मात्र आता पालघर आणि भंडारा-गोंदिया या लोकसभा मतदार संघाच्या पोटनिवडणुकीसाठी शिवसेनेने उमेदवार निश्चित केला आहे. भाजपावर नाराज असलेले शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी विधान परिषद उमेदवारी जाहीर केल्यानंतर लोकसभा पोटनिवडणुकीची तयारी सुरू केल्याने भाजपची मात्र कोंडी होणार आहे. २०१९ च्या निवडणुकीचा अंजेडा निश्चित करून ‘एकला चलो रे’चा नारा देत शिवसैनिकांचे मनोबल आणि पक्षाचा जनाधार वाढवण्यासाठी सेनेने प्रयत्न सुरू केले आहेत.

पटोलेंच्या राजीनाम्यामुळे पोटनिवडणूक

भाजपवर नाराज असलेले भंडारा-गोंदियाचे खासदार नाना पटोले यांनी खासदारकीचा राजीनामा दिल्याने या ठिकाणी पोटनिवडणूक होत आहे. भंडारा-गोंदियासाठी भाजपने राष्ट्रवादीचे नेते खासदार प्रफुल्ल पटेल यांची मुलगी पूर्णा पटेल हिला उमेदवारी देण्याची तयारी सुरू केली आहे. या मतदारसंघात शिवसेनेची निर्णायक मते असल्याने सेनेने उमेदवाराची चाचपणी सुरू केली आहे.

शिवसेनेची अडीच लाख मते

पालघर लोकसभा मतदारसंघातील भाजप खासदार चिंतामण वनगा यांचे निधन झाल्यामुळे रिक्त झालेल्या जागेवर पोटनिवडणूक होत आहे. चिंतामण वनगा यांच्या जागेवर विष्णू सावरा यांना उमेदवारी देण्याची शक्यता होती. ‘पालघर मतदार संघात शिवसेनेची अडीच लाख मते आहेत, या मतांची ताकद भाजपला योग्य वेळीच कळेल’, असे शिवसेनेचे नेते सांगत आहेत.

First Published on: April 27, 2018 12:45 PM
Exit mobile version