दसरा मेळाव्यासाठी शिवसेना आक्रमक; शिवाजी पार्क परिसरात पोलिसांचा मोठा बंदोबस्त

दसरा मेळाव्यासाठी शिवसेना आक्रमक; शिवाजी पार्क परिसरात पोलिसांचा मोठा बंदोबस्त

मुंबई : शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्यासाठी मुंबई महापालिकेने अद्यापही कोणालाच परवानगी दिलेली नाही. मात्र मेळावा घेण्यासाठी शिवसेना उद्धव ठाकरे गट खूपच आक्रमक झालेला आहे. त्यामुळे कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी मुंबई पोलिसांनी शिवाजी पार्क परिसरात बंदोबस्त वाढवला आहे. शिवाजी पार्क मैदानाभोवती सुरक्षिततेचे कडे उभारण्याची तयारी पोलिसांनी चालवली आहे. त्याचप्रमाणे, पोलिसांनी पालिकेच्या जी/ उत्तर विभाग कार्यलयासमोरही पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आलेला आहे. (Shiv Sena Aggressive for Dussehra Gathering Heavy police presence in Shivaji Park area)

शिवसेनेच्या मेळाव्याला परवानगी मिळू नये यासाठी राज्य सरकारचा पालिकेवर दबाब आहे, असा आरोप शिवसेनेचे माजी महापौर व नेते मिलिंद वैद्य यांनी केला आहे. शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडून शिवाजी पार्कवरील दसरा मेळाव्याकरिता परवानगी मिळण्यासाठी पालिकेकडे पाठपुरावा सुरू आहे.

मागील ४० पेक्षाही जास्त वर्षांपासून एक मैदान, एक पक्ष व एक नेता याप्रमाणे शिवाजी पार्क मैदानावर शिवसेनेचा दसरा मेळावा साजरा करण्यात येत असतो. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेत असतात. मात्र राज्यात अडीच वर्षांपूर्वी मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीवरून राजकीय भूकंप होऊन भाजप व शिवसेना यांचे बिनसले. शिवसेनेने काँग्रेस – राष्ट्रवादी यांना सोबत ‘महाविकास’ आघाडी सरकार स्थापन केले. मात्र अडीच वर्षांनंतर शिवसेनेत मोठी बंडखोरी झाली.

सध्याचे मुख्यमंत्री व तत्कालीन शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सेनेच्या ४९ आमदारांनी बंडखोरी करून वेगळा गट केला. भाजपशी संधान साधून राज्यात राजकीय भूकंप केला आणि सत्ता स्थापन केली. या सत्तासंघर्षाचे प्रकरण सध्या सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे.

दुसरीकडे, दसरा मेळावा तोंडावर आलेला असताना शिवाजी पार्कवर यंदा मेळावा घेण्यासाठी उद्धव ठाकरे गटाने प्रथम व त्यानंतर शिंदे गटानेही दावा केला आणि तसे अर्ज पालिकेकडे सादर केले आहेत. त्यामुळे दसरा मेळाव्याची परवानगी नेमकी कोणाला द्यायची यावर बुचकल्यात पडलेल्या पलिकेने विधी खात्याचा सल्ला मागवल्याचे बोलले जात आहे. तर विधी खात्याने आपल्याकडे अद्याप कोणताच प्रस्ताव आलेला नसल्याचे सांगत हात वर केले आहेत. त्यामुळे आता परवानगी कोणाला मिळणार याबाबत अद्यापही स्पष्टता आलेली नाही.

दुसरीकडे शिंदे गटाला बीकेसी येथे मेळावा घेण्यासाठी एमएमआरडीए ने परवानगी दिलेली असली तरी शिवाजी पार्कबाबतचा दावा त्यांनी सोडलेला नाही. आम्हाला नाही तर कोणालाही नाही, बहुतेक अशीच काहीशी भूमिका शिंदे गटाची असावी. मात्र उध्दव ठाकरे गट शिवाजी पार्कवरच दसरा मेळावा घेण्यासाठी आग्रही व आक्रमक आहे.

सत्ता संघर्षावरून व पक्ष चिन्हावरून उद्धव व शिंदे गटातील अगोदरपासून ताणतणाव आणि आता दसरा मेळाव्यावरून झालेला तणाव पाहता कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी मुंबई पोलिसांनी शिवाजी पार्क परिसरात बंदोबस्त वाढवला आहे. शिवाजी पार्क मैदानाभोवती सुरक्षिततेचे कडे उभारण्याची तयारी पोलिसांनी चालवली आहे.

दरम्यान, शिवसेनेने गोरेगाव, नेस्को येथे पर्याय म्हणून मेळाव्याची तयारी चालवल्याचे बोलले जात आहे. मात्र मुंबई महापालिका उद्धव ठाकरे गटाला दसरा मेळाव्यासाठी परवानगी देण्याबाबत अनुकूल नसल्याचे आतापर्यंतच्या वस्तूपरिस्थितीवरून समोर येत आहे. मात्र शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडून शिवाजी पार्कवरच दसरा मेळावा घेण्यासाठी हालचाली झाल्यास सेनेला रोखण्यासाठी व कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी पोलिसांनी आतापासूनच शिवाजी पार्क परिसरात बंदोबस्त वाढवला आहे.

शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडून परवानगीसाठी पाठपुरावा

मंगळवारी शिवसेनेचे नेते व माजी महापौर मिलिंद वैद्य यांनी शिष्टमंडळासह पालिकेच्या जी/ उत्तर विभाग कार्यालयात जाऊन परवानगीबाबत अधिका-यांची भेट घेतली. यावेळी प्रसार माध्यमांशी बोलताना वैद्य यांनी , दसरा मेळाव्यासाठी परवानगी मिळो अथवा न मिळो उद्धव ठाकरे सांगतील तेथे यंदाचा दसरा मेळावा होणार म्हणजे होणारच, असे स्पष्ट केले. विधी खात्याकडून आतापर्यंत कोणताही निर्णय झाला नसल्याने कोणत्या गटाला परवानगी द्यायची याबाबत ठरवता येणार नाही.
विधी विभागाने अभिप्राय दिल्यानंतर कळवले जाईल, असे प्रशासनाक़डून शिष्टमंडळाला सांगण्यात आल्याचे वैद्य यांनी सांगितले.

राज्य सरकारचा दबाव

शिवसेनेच्या मेळाव्याला परवानगी मिळू नये यासाठी राज्य सरकारचा पालिकेवर दबाब आहे, असा आरोप मिलिंद वैद्य यांनी केला आहे. दसरा मेळाव्याच्या परवानगीसाठी पालिकेकडे अर्ज करून शिवसेनेला एक महिन्यांचा कालावधी झाला तरी यावर कोणताही निर्णय झालेला नाही. शिंदे गटाने बीकेसीसाठी परवानगी मागितली होती. त्यांना परवानगी मिळाली आहे. त्या ठिकाणी त्यांनी पैसेही भरले आहेत. एकाच ठिकाणी दोन गटाने अर्ज केला असता तर त्याचा विचार केला गेला असता. पण आता तोही प्रश्न उरला नाही. या मेळाव्याला परवानगी देताना कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न असल्याचे सांगितले जाते मात्र त्याचा येथे काहीही संबंध नाही, असे मिलिंद वैद्य यांनी सांगितले.


हेही वाचा – बदलीसाठी दबाव आणणाऱ्या अधिकारी- कर्मचाऱ्यांविरुद्ध शिस्तभंगाची कारवाई करणार -रवींद्र चव्हाण

First Published on: September 20, 2022 7:57 PM
Exit mobile version