शिवसेना आता एका टचवर; ‘शिवसेना ई डायरी’ मोबाईल अ‍ॅपवर उपलब्ध!

शिवसेना आता एका टचवर; ‘शिवसेना ई डायरी’ मोबाईल अ‍ॅपवर उपलब्ध!

राज्यात सत्ताधारी असलेला शिवसेना पक्ष हा काही वर्षांपूर्वी एका क्लिकवर आला होता, म्हणजेच पक्षाचे अधिकृत संकेतस्थळ सुरु करण्यात आले होते. ऑनलाईनच्या जमान्यात शिवसेना एका क्लिकवरून आता एका टचवर आली आहे. मुंबईतील दोन तरुणांनी एकत्र येत ‘शिवसेना ई डायरी’ हे अ‍ॅप सुरु केले आहे. या अ‍ॅपमध्ये शिवसेना पक्षप्रमुखांपासून ते महिला आघाडी, अंगीकृत संघटनापर्यंत सर्वच नेते, पदाधिकार्‍यांचे संपर्क क्रमांक देण्यात आले आहेत. त्यामुळे या अ‍ॅपवर एक टच करताच शिवसेनेच्या सर्व नेत्यांपासून पदाधिकार्‍यांपर्यंत सर्वांचे क्रमांक, फेसबुक आणि ट्विटर अकाउंटवर संपर्क साधता येणार आहे.

या लिंकवरून करा डाऊनलोड

मुंबईसह महाराष्ट्रावर कोणतेही संकट आले की रस्त्यावर उतरून मदतीसाठी पुढाकार घेण्यात शिवसेना हा पक्ष आघाडीवर असतो. त्यामुळे लोकांना सहज संपर्क साधता यावा यासाठी काही वर्षांपूर्वी शिवसेना भवनकडून शिवसेनेचे अधिकृत संकेतस्थळ सुरू करण्यात आले. यामध्ये पक्षाच्या नेत्यांपासून सर्वच पदाधिकार्‍यांपर्यंत सर्वांचे दूरध्वनी सर्वसामान्यांना उपलब्ध झाले होते. मात्र आता सर्वच गोष्टी मोबाईलमध्ये अ‍ॅपच्या माध्यमातून सामावल्या जात असताना शिवसेनाही अ‍ॅपमधून तरुणांसमोर आली आहे. युवा सेनेचे मुंबई विद्यापीठ सिनेट सदस्य अ‍ॅड वैभव थोरात आणि दीपक शेडे यांनी ‘शिवसेना ई डायरी’ या नावाने हे अ‍ॅप बनवले आहे. ‘शिवसेना ई डायरी’ गुगल प्ले स्टोअर वर मोफत उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. https://play.google.com/store/apps/details?id=uni.ssediaryok- या लिंकवरून ही डायरी डाऊनलोड करता येणार आहे.

हे आहे अ‍ॅपचे वैशिष्ट्य

शिवसेनेच्या संकेतस्थळावर पक्ष प्रमुखांसह नेते व पदाधिकार्‍यांचे दूरध्वनी क्रमांक दिले होते. मात्र अ‍ॅपमध्ये दूरध्वनी क्रमांकासह त्यांचे फेसबुक, ट्विटर अकाउंट ही दिले आहे. या अ‍ॅपचे वैशिष्ट्य म्हणजे यावर दिलेल्या फेसबुक आणि ट्विटर अकाउंटच्या लिंकला टच करताच नागरिकांना थेट संबंधित नेते व पदाधिकार्‍यांच्या अकाउंटवर जाता येते. त्यामुळे नेते व पदाधिकार्‍यांशी दूरध्वनीसह फेसबुक व ट्विटर अकाउंटवर ही सहज संपर्क साधता येणार आहे.

कोणाशी संपर्क साधता येईल

‘शिवसेना ई डायरी’मध्ये शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे, युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्यापासून शिवसेनेचे नेते, उपनेते, मंत्रिमंडळ, लोकसभा सदस्य, राज्यसभा सदस्य, विधानसभा व विधान परिषद सदस्य, पक्षाचे सचिव, प्रवक्ते, जिल्हाप्रमुख, संपर्क प्रमुख, युवा सेना, भारतीय कामगार सेना, स्थानीय लोकाधिकार समिती, महिला आघाडी यासह पक्षाच्या अंगीकृत संघटनांचे प्रमुख व पदाधिकारी यांचे संपर्क दिले आहेत.

First Published on: July 26, 2020 8:32 PM
Exit mobile version