अखेर शिवसेना एनडीएतून बाहेर

अखेर शिवसेना एनडीएतून बाहेर

अरविंद सावंत यांचा राजीनामा

शिवसेना-भाजप यांची युती तुटल्यानंतर तसेच राज्यपालांनी शिवसेनेला सत्तास्थापनेसाठी निमंत्रण दिल्यावर शिवसेनेने राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांना पाठिंब्यासाठी मिनतवार्‍या सुरू केल्या. मागील दोन दिवसांपासून याकरता दोन्ही काँग्रेस सेनेला एकामागोएक अटी-शर्ती घालू लागल्या. त्यातील एक महत्त्वाची अट ही शिवसेनेने राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए)तून बाहेर पडावे. ही अट मान्य करत केंद्रातील सत्तेत शिवसेनेचा एकमेव मंत्री अवजड उद्योग मंत्री अरविंद सावंत यांना मंत्रीपदाचा राजीनामा देण्याचा आदेश ‘मातोश्री’मधून देण्यात आला. त्यानुसार सकाळच्या सत्रात सावंत यांनी राजीनामा देऊन शिवसेना अधिकृतपणे एनडीएतून बाहेर पडली.

अरविंद सावंत यांनी त्यांच्या मंत्रीपदाचा राजीनामा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे सुपूर्द केला. भाजपने दिलेला शब्द पाळला नाही. शिवसेनेचा ५०-५०चा फॉर्म्युला भाजपने स्वीकारला नाही. त्यामुळे सेना-भाजप यांच्यात सत्तास्थापनेच्या पार्श्वभूमीवर वितुष्ट निर्माण झाले होते. अखेर राज्यपालांनी सर्वाधिक मोठा पक्ष म्हणून प्रथम भाजपला सत्ता स्थापनेसाठी निमंत्रण पाठवले, भाजपने ते विनम्रपणे नाकारल्यावर राज्यपालांनी शिवसेनेला सत्तास्थापनेसाठी निमंत्रण पाठवून दोन दिवसांचा अवधी दिला. त्यानंतर शिवसेनेची दोन्ही काँग्रेसच्या नेत्यांसोबत पाठिंब्याबाबत बैठका सुरू झाल्या.

त्यादरम्यान दोन्ही काँग्रेसकडून शिवसेनेसमोर एकामागोएक अटी-शर्ती समोर ठेवण्यात येऊ लागल्या. त्यांची पूर्तता करताना सेनेची चांगलीच दमछाक होऊ लागली. त्यातील अत्यंत महत्त्वाची अट ही शिवसेनेने एनडीएतून बाहेर पडावे, अशी होती. त्यानुसार शिवसेनेने हीदेखील मागणी मान्य केली. त्यामुळे शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानंतर अरविंद सावंत यांनी केंद्रातील मंत्रीपदाचा राजीनामा दिला, तसे ट्विट सावंत यांनी केले.

आपला निर्णय जाहीर करताना सावंत यांनी भारतीय जनता पक्षावर टीका केली. लोकसभा निवडणुकीपूर्वी जागा वाटप आणि सत्ता वाटपाचे सूत्र ठरले होते. दोन्ही पक्षांना हे सूत्र मान्य होते. आता हे सूत्रच नाकारून शिवसेनेला खोटे ठरवण्याचा प्रकार धक्कादायक आहे, म्हणून शिवसेनेने भाजपसोबत न जाण्याचा निर्णय घेतला, असे अरविंद सावंत म्हणाले.

दरम्यान राज्यपालांनी शिवसेनेला सत्तास्थापनेचा दिलेला अवधी संपला तरी काँग्रेस हायकमांडकडून पाठिंबा दिला नाही, त्यामुळे शिवसेना सत्तास्थापनेचा दावा करण्यात एका बाजूला अपयशी झाली आणि दुसर्‍या बाजूला शिवसेना एनडीएतून बाहेर पडल्यामुळे केंद्रातील सत्तेलाही मुकली.

First Published on: November 12, 2019 6:35 AM
Exit mobile version