‘आहेर नको, मतदान करा’

‘आहेर नको, मतदान करा’

कोल्हापुरात शिवसेना नेत्याचा अनोखा प्रचार

निवडणुका आल्या की जनतेच्या दारात मतांचा जोगवा मागणारे अनेक पुढारी आपण आतापर्यंत पाहिले असतील. मात्र, एका उमेदवाराने मतांसाठी चक्क मुलाच्या लग्नपत्रिकेचा आधार घेऊन ‘आहेर नको पण मत नक्की द्या’ असे भावनिक आवाहन लग्नपत्रिकेच्या माध्यमातून केले आहे. कोल्हापूर जिल्ह्यातल्या कागल पंचायत समितीचे उपसभापती यांनी ही पत्रिका छापली आहे. त्यांच्या मुलाच्या लग्नात येणार्‍या वर्‍हाडी मंडळींना त्यांनी अशाप्रकारचे आवाहन केले आहे. त्यांच्या या आवाहनामुळे सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या आहेत.

कागल पंचायत समितीचे उपसभापती विजय भोसले यांच्या मुलाचा येत्या १० फेब्रुवारीला लग्न सोहळा आहे. त्यामुळे या लग्नासाठी येणार्‍या वर्‍हाडी मंडळींसाठी त्यांनी एक अट दिलेली आहे. यामध्ये असे लिहिले आहे की, लग्नाला येणार्‍या सगळ्या नातेवाईकांनी लग्नामध्ये आहेर आणि भेटवस्तू आणू नयेत. मात्र, या बदल्यात येत्या २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत संजय दादा मंडलिक यांना प्रचंड बहुमताने विजयी करा. तीच आमच्यासाठी भेटवस्तू ठरेल, अशी त्यांनी विनंती केलेली आहे. ही लग्नपत्रिका सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणामध्ये व्हायरल होत असून, सगळेजण या पत्रिकेची खिल्ली उडवत आहेत.

मूळचे भुदरगडचे असणारे विजय भोसले यांचा मुलगा अभयसिंह भोसले याचा विवाह कागल शहरात येत्या १० फेब्रुवारीला मोठ्या उत्साहामध्ये संपन्न होणार आहे. राजकीय नेत्याच्या मुलाचा विवाह असल्यामुळे या विवाहाला तितकीच गर्दी होण्याची शक्यता आहे. मात्र, लोकांना निमंत्रण देण्यासाठी छापण्यात आलेल्या लग्नपत्रिकेच्या माध्यमातून आवाहन केल्यामुळे सध्या विजय भोसले चर्चेत आहेत.

First Published on: February 1, 2019 4:06 AM
Exit mobile version