सिंधुदुर्ग जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीत शिवसेना सत्ताधारी भाजपला धक्का देण्याच्या तयारीत?

सिंधुदुर्ग जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीत शिवसेना सत्ताधारी भाजपला धक्का देण्याच्या तयारीत?

सिंधुदुर्ग जिल्हा परिषद

सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाची निवडणूक बुधवारी (२४ मार्च) होणार असून ओबीसी महिला प्रवर्गासाठी आरक्षित असलेल्या या पदासाठी सत्ताधारी भाजपकडून मनस्वी घारे यांचे नाव आघाडीवर आहे. त्याशिवाय अनेक नावे चर्चेत आहेत, तर दुसरीकडे शिवसेनेनेही भाजपच्या नाराज सदस्यांना हाताशी धरून अध्यक्षपद निवडणुकीत करिष्मा करण्याची तयारी केल्याची चर्चा आहे. त्यामुळे जिल्हा परिषद अध्यक्ष निवडीकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. जिल्हा परिषद अध्यक्ष व चार विषय समिती सभापतींनी राजीनामा दिल्यानंतर रिक्त झालेल्या पदाच्या निवडीसाठी जिल्हाधिकारी के. मंजूलक्ष्मी यांनी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला असून अध्यक्षपदाची निवडणूक २४ मार्चला तर चार विषय समिती सभापती पदाची निवडणूक २६ मार्चला होणार आहे. दरम्यान अध्यक्षपदी व सभापतीपदी कुणाची वर्णी लागणार याकडे सर्वांचे लक्ष आहे.

जिल्हा परिषद पदाधिकाऱ्यांना अडीच वर्षाचा कालावधी असला तरी सर्वांना संधी मिळावी यासाठी पक्षीय धोरणानुसार सव्वा-सव्वा वर्षाची संधी दिली जाते. त्याप्रमाणे मावळत्या अध्यक्षा समिधा नाईक यांनी ४ मार्चला अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. तसेच बांधकाम व वित्त सभापती रवींद्र जठार, शिक्षण व आरोग्य सभापती सावी लोके, महिला व बालविकास सभापती माधुरी बांदेकर, समाजकल्याण सभापती शारदा कांबळे यांनीही त्याचदिवशी विषय समिती सभापतीपदाचे राजीनामे दिले होते. तर उपाध्यक्ष राजेंद्र म्हापसेकर यांच्याकडे प्रभारी अध्यक्षपदाचा कार्यभार देण्यात आलेला होता. जिल्हा प्रशासनाकडे राजीनामे प्राप्त होताच तात्काळ रिक्त पदाची निवडणूक जिल्हाधिकाऱ्यांनी जाहीर केली.

अध्यक्षपदाची माळ कुणाच्या गळ्यात?

जिल्हा परिषद अध्यक्षपद हे ओबीसी महिलांसाठी आरक्षित आहे. त्यामुळे या प्रवर्गातील सत्ताधारी पक्ष भाजपकडे असलेल्या महिला सदस्य संजना सावंत, मनस्वी घारे, उन्नती धुरी, माधुरी बांदेकर, समिधा नाईक यांचा समावेश आहे. यापैकी देवगड तालुक्यातील किंजवडे मतदार संघातून भाजपमधून निवडून आलेल्या मनस्वी घारे यांचे नाव अध्यक्षपदासाठी आघाडीवर आहे. भाजपकडे एकूण ३१ सदस्य असल्याने पूर्ण बहुमत आहे. परंतु, काही सदस्य नाराज असल्याने शिवसेनेसोबत जाण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. त्यामुळे खासदार नारायण राणे यांनी सर्व सदस्यांची एक बैठक घेऊन सर्वांनी एकसंघ राहण्याच्या कडक सूचना दिल्या आहेत.

शिवसेनाही निवडणूक लढण्याच्या तयारीत

शिवसेनेकडे १९ सदस्य आहेत. पूर्ण बहुमत नसले तरी अध्यक्षपदाची निवडणूक लढण्याची तयारी त्यांनी केली आहे. भाजपचे नाराज सदस्य हाताशी लागले तर भाजपला शिवसेना धक्का देऊ शकते. त्यामुळे शिवसेनेमधून ओबीसी महिला प्रवर्गातील सदस्य स्वरूपा विखाळे याचे नाव पुढे येऊ शकते. तसेच शिवसेनेने आपल्या सदस्यांची फोडाफोडी होऊ नये यासाठी गोवा सीमेवर एका अज्ञात स्थळी ठेवण्यात आले आहे. त्यामुळे जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडीची उत्सुकता वाढली आहे.

First Published on: March 23, 2021 10:44 PM
Exit mobile version