‘राज्यात ठाकरे सरकारचा शब्द चालेल, अल्टिमेटम नाही’; संजय राऊतांचा मनसेना टोला

‘राज्यात ठाकरे सरकारचा शब्द चालेल, अल्टिमेटम नाही’; संजय राऊतांचा मनसेना टोला

मशिदींवरील भोंग्यांविरोधात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आक्रमक भूमिका घेतली असून 4 मे रोजी राज्यभर आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. राज ठाकरेंच्या या भाषणानंतर सर्वत्र वातावरण तापलं असून, आता महाविकास आघाडीचे नेते प्रतित्युत्तर देत आरोप करत आहेत. नुकताच शिवसेना नेते संजय राऊत यांनी राज ठाकरेंवर हल्लाबोल करत ‘राज्यात कोणाचाही अल्टिमेटम चालणार नाही, फक्त ठाकरे सरकारचा शब्द चालणार’, असा टोला त्यांनी लगावला.

“अल्टिमेटमवरती राज्य चालत नाही. महाराष्ट्रातील यंत्रणा सक्षम आहेत. नेतृत्व सक्षम आहे. सरकार भक्कम आहे. कोणी जर हे राज्य अस्थिर करण्याचे प्रयत्न अशापद्धतीने करत असेल तर ते फार मोठी चूक करत आहेत”, असं संजय राऊत यांनी म्हटलं.

“व्यक्ती कितीही मोठी असली तरी अशाप्रकारचे गुन्हे हे दाखल होत असतात. आमच्यावर ही झालेत, आमच्या लिखाणावर, आमच्या वक्तव्यावर असे गुन्हे दाखल झालेत. कायद्याचे कोणी उल्लंघन करत असेल तर, त्याच्यावर गुन्हे दाखल केले जातात. चितावणीखोर, भडकावू भाषण देणं. आता सामनावरती आणि आमच्या अग्रलेखावरती त्या कलमांखाली अनेक गुन्हे दाखल आहेत. त्यामुळे त्यात नवीन असं काहीच नाही.”

राज ठाकरेंना सरकारेना अटक करण्याची सरकारची भूमीका आहे का? असा सवाल विचारला असता त्यांनी “सरकारची भूमीका सरकार ठरवेल. पण या क्षणी महाराष्ट्रात कायदा सुव्यवस्थेचे राज्य आहे. राज्यामध्ये शांतता आणि सुव्यवस्था आहे. नक्कीच अशी माहिती आहे. राज्याच्या बाहेरुन काही गुंड प्रवृत्तीची लोक मुंबईत आणून गडबड करायची. ज्याची ताकद नाही. शेवटी हे सुपारीचे राजकारण आहे. पण या सुपाऱ्या ज्या आहेत या राज्यात चालणार नाहीत. मुंबईचे आणि राज्याचे पोलीस सक्षम आहेत. गृहखात्याचे नेतृत्व सक्षम आहे. सगळ्या घडामोडींवर मुख्यमंत्र्यांचे लक्ष आहे. त्यामुळे फार कोणी चिंता करण्याची गरज नाही.”, असं संजय राऊत यांनी म्हटलं.


हेही वाचा – कुणीही मनात आणलं तरी राज्याची सुव्यवस्था बिघडवू शकत नाही – खासदार संजय राऊत

First Published on: May 3, 2022 3:27 PM
Exit mobile version